Sharad Koli : सोलापूर येथील युवा नेते आणि ‘धाडस’ संघटनेचे संस्थापक शरद कोळी यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई येथील ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी शरद कोळींच्या हाताला ठाकरेंनी शिवबंधन बांधले. तसेच जिथे कमी तिथे आम्ही म्हणत शरद कोळी यांनी गद्दारांना गाडण्याची शपथही यावेळी घेतली.
‘धाडस’ संघटनेच्या माध्यमातून शरद कोळी यांचे सोलापूर जिल्ह्यात मोठे नेटवर्क आहे. तसेच या संघटनेच्या कामाच्या माध्यमातून त्यांचा लोकांशी चांगला संपर्कदेखील आहे. ‘धाडस’ संघटनेच्या ५ हजार पेक्षा जास्त शाखा असल्याचा त्यांचा दावा आहे. या ५ हजार शाखांच्या पदाधिकाऱ्यांसहित शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे ते बोलले होते.
शरद कोळी यांनी ५० पेक्षा जास्त गाड्या मुंबईकडे रवाना करत शिवसेनेत प्रवेश केला. शरद कोळी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. २०१६ पासून धाडस संघटनेच्या माध्यमातून शरद कोळी यांनी सामाजिक कार्य सुरू केले. सोलापूर ग्रामीण भागातील चार पोलीस ठाण्यात एकूण १६ गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.
शरद कोळी यांनी सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या वाळू ठेकेदारांना आणि वाळू माफियांना टार्गेट केले. ठेकेदारांविरोधात आंदोलन करणे, माहिती अधिकारातून तपशील काढणे, कारवाई करण्यास भाग पाडणे यामुळे ते चर्चेत होते. या माध्यमातून त्यांनी अफाट संपत्तीही कमावली व त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा हल्लेही झाले.
त्यांच्यावर सोलापुरातील मोहोळ, कामती, मंद्रुप आणि तालुका पोलीस ठाण्यात खंडणी, अपहरण, हाणामारी अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल आहेत. तसेच दमदाटी, धमकावणे, खंडणी, तडीपार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची त्यांच्या नावाने नोंद आहे. दुसरीकडे शरद कोळींचा काँग्रेसचे तत्कालीन ओबीसी मंत्री वडेट्टीवार यांच्यासोबतही ओबीसी आंदोलनात सहभाग होता.
या गुन्हेगारी पार्श्वभुमीबरोबरच शरद कोळी यांची राजकीय महत्वाकांक्षादेखील आहे. त्यातूनच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. २०१२ मध्येही शरद कोळी शिवसेनेत होते. त्यांनतर धाडस या सामाजिक संघटनेची त्यांनी स्थापना केली. शरद कोळींमुळे सोलापूरच्या ग्रामीण भागात शिवसेनेचा संपर्क वाढला जाईल असे सांगण्यात येत आहे. परंतु गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे उद्धव ठाकरेंना त्यांचा फायदा होईल का? असा प्रश्न आहे.