Share

Ahilyanagar : पक्षफुटीच्या काळात उद्धव ठाकरेंना ठाम साथ, पण निवडणुकीच्या तोंडावरच पक्षाला रामराम; माजी मंत्री ‘मशाल’ऐवजी क्रांतीकारी पक्षातून रिंगणात

Ahilyanagar : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले असून, सर्वच पक्षांत हालचालींना गती आली आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील राजकारणात एक मोठा उलथापालथ करणारा निर्णय समोर आला आहे. राज्याचे माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) गटाची साथ सोडून पुन्हा एकदा आपल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातून आगामी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षफुटीच्या काळात साथ देणारे गडाख आता दूर

शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबत ठामपणे उभे राहिलेले नेते म्हणून गडाख ओळखले जात होते. पण आता त्यांनी ठाकरे गटाला रामराम करत स्वबळावर मैदानात उतरण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मशाल चिन्हावर (Mashal Symbol) लढत दिली होती, मात्र त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तरीही, ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे मृदा आणि जलसंधारण विभागाचे मंत्री होते. आता मात्र त्यांनी पुन्हा आपल्या जुन्या पक्षाकडे वळत नव्या राजकीय समीकरणांना उभारी दिली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग

राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे, तर मतदान 2 डिसेंबरला आणि मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवार निवडीसाठी मुलाखतींना सुरुवात केली आहे.

दरम्यान, महायुती एकत्र निवडणुका लढवेल का, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आघाडी एकत्र असल्याचं स्पष्ट केलं असलं, तरी स्थानिक पातळीवरील मतभेद मात्र अद्याप कायम आहेत. त्यामुळे काही ठिकाणी मित्रपक्षांमध्येच थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गडाख यांच्या निर्णयाने ठाकरे गटात अस्वस्थता

शंकरराव गडाख यांच्या या निर्णयाने अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटासाठी हा अनपेक्षित धक्का असला, तरी गडाख यांच्या क्रांतिकारी पक्षातून पुन्हा मैदानात उतरण्यामुळे स्थानिक निवडणुकांचा रंग अधिकच चुरशीचा होणार आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now