Vaishnavi Hagavane : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूप्रकरणात नवे खुलासे समोर येत आहेत. प्रथमदर्शनी आत्महत्या वाटणाऱ्या या घटनेचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर हत्या झाल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान, हगवणे कुटुंबीयांनी मोठ्या सुनेलाही मानसिक व शारीरिक छळ केल्याचे उघड झाले आहे.
मोठ्या सुनेने नोव्हेंबर २०२४ मध्ये पौड पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता. तक्रारीनुसार, सासरे राजेंद्र हगवणे यांनी तिला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली होती आणि अत्यंत अमानवी व लज्जास्पद वागणूक दिली होती. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती, असा आरोप आहे.
वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबीयांच्या विरोधातील गंभीर आरोप समोर येत आहेत. वैष्णवीच्या आईवडिलांनी तिच्या आठवणी सांगताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांनी अजित पवार यांना भावनिक आवाहन करत, “तुमच्या लाडक्या बहिणीसारख्या वैष्णवीला न्याय द्या,” अशी मागणी केली.
घटनेनंतर सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर फरार झाले असून, पती शशांक, सासू व नणंद यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, अजित पवार आणि राजेंद्र हगवणे यांच्यातील जवळच्या संबंधांमुळे या प्रकरणात हस्तक्षेप होतोय, अशी चर्चा रंगत आहे.
पोलिसांनी तात्पुरता दावा केला आहे की, ही आत्महत्या होती. मात्र, मृतदेहेवरील जखमा, हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचे पुरावे मिळाल्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलिसांनी सांगितले की, तीन विशेष पथक राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलाचा शोध घेत आहेत.
serious-allegations-against-vaishnavi-hagavanes-family-beating-till-clothes-were-torn