Dinanath Mangeshkar Hospital : शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आले असून, रुग्णालय प्रशासनाच्या पैशांच्या हव्यासामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.
तनिषा भिसे यांना प्रसूतीचा त्रास होऊ लागल्यानंतर तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्याआधी दहा लाख रुपयांची मागणी केली. कुटुंबीय अडीच लाख रुपये भरायला तयार होते, तरीही रुग्णालयाने गर्भवती महिलेला दाखल करून घेतले नाही. वेळ वाया गेल्याने तिची प्रकृती बिघडली आणि दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, तनिषाचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयाने पत्नीला दाखल करून घेत नसल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातील अधिकाऱ्यांनी रुग्णालयात संपर्क केला, तरीही व्यवस्थापनाने दुर्लक्ष केलं.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. रुग्णालयासमोर शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आलं, रुग्णालयाच्या पाटीवर काळं फासण्यात आलं आणि संतप्त नागरिकांनी चिल्लर फेकून निषेध नोंदवला. एक महिला म्हणाली, “पैसे पुन्हा मिळवता येतात, पण गेलेलं माणूस परत येणार नाही!”
तनिषा आणि सुशांत यांचा आठ वर्षांचा सुखी संसार – नियतीने घेतला क्रूर परीक्षा
तनिषा आणि सुशांत यांचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. शिक्षिकेच्या भूमिकेतून गृहिणी झालेल्या तनिषा आणि प्रशासकीय विभागात नोकरी करणारे सुशांत यांनी सामंजस्याने आपला संसार उभा केला होता. समाजसेवेत सक्रिय असलेल्या सुशांत यांना ‘आरोग्यदूत’ हा पुरस्कारही मिळाला होता.
आठ वर्षांनंतर तनिषा गर्भवती होती आणि त्यांच्या घरी पहिल्यांदाच चिमुकल्या पावलांचे आगमन होणार होतं. दोघंही आनंदात होते, कारण तनिषा जुळ्या मुलांना जन्म देणार होती. मात्र नियती आणि रुग्णालय व्यवस्थापनाच्या बेपर्वाईने त्या आनंदावर काळोख पसरवला.
तनिषाने प्रसूती दरम्यान दोन निरोगी बाळांना जन्म दिला, पण तिचा स्वतःचा जीव वाचवता आला नाही.
सामाजिक आणि राजकीय पातळीवर संताप
या घटनेनंतर आमदार अमित गोरखे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे. रुग्णालयाच्या पैशांसाठीच्या हट्टामुळे एक जीव गमावावा लागल्याची ही घटना मेडिकल व्यवस्था आणि रुग्णसेवेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं करते.
गरिबांसाठी आणि सामान्य माणसासाठी आरोग्य सेवा सुलभ होईल का, की केवळ श्रीमंतांच्या मक्तेदारीखाली असेच मृत्यू होत राहतील? असा सवाल संतप्त पुणेकर करत आहेत.
या घटनेची चौकशी करण्यात यावी, संबंधितांवर कारवाई व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.