Operation Sindoor : 8 मे 2025 काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध पर्यटकांचा बळी गेल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचललं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांचा यशस्वी बीमोड केला. या कारवाईनंतर सीमेवर तणाव वाढल्याने भारतीय लष्करानं जवानांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द केल्या असून, सर्व जवानांना कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील मनोज न्यानेश्वर पाटील या नवविवाहित जवानाने देशसेवेसाठी दिलेला प्रतिसाद सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रेरणादायी ठरत आहे.
लग्नाच्या दोन दिवसांत कर्तव्यावर हजर
मनोज पाटील यांचा विवाह 5 मे रोजी पाचोरा तालुक्यातील नाचणखेडे येथील यामिनी रामचंद्र पाटील यांच्यासोबत पार पडला. लग्नाच्या आनंदात मग्न असतानाच, भारत-पाकिस्तान सीमेवर वाढलेल्या तणावामुळे मनोज यांना तात्काळ सेवेवर हजर होण्याचे आदेश प्राप्त झाले. अंगावर हळदीचे डाग होते, हातावर नववधूच्या नावाची मेहंदी होती, तरीही मनोज यांनी कोणताही विलंब न करता देशरक्षणासाठी आपली कर्तव्यभावना सिद्ध केली.
“ऑपरेशन सिंदूर”साठी कुंकू पाठवतेय…
यामिनी पाटील या नववधूने पतीच्या या धाडसी निर्णयावर अभिमान व्यक्त करत प्रतिक्रिया दिली — “देशासाठी मी माझं कुंकू पाठवतेय. मनोज माझा नवरा आहे, पण तो आधी देशाचा जवान आहे.” तिची ही भावना सध्या सोशल मीडियावर भावूक करीत आहे. एका सामान्य स्त्रीची ही देशभक्तीची भावना लाखो भारतीयांना स्फूर्ती देत आहे.
कर्तव्यनिष्ठेचं जिवंत उदाहरण
मनोज पाटील यांचं उदाहरण हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी ठरत आहे. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी देशरक्षणासाठी सज्ज होणं ही फक्त कर्तव्यभावना नव्हे, तर ती देशप्रेमाची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे. अशा जवानांमुळेच देश आज सुरक्षित आहे, असं मत नागरिक व्यक्त करत आहेत.
सीमेवर युद्धजन्य परिस्थितीचा इशारा
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार सुरू झाल्याने सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी, लष्करातील सर्व सुट्ट्यांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली असून, देशभरातील जवानांना तात्काळ त्यांच्या तैनातीच्या ठिकाणी परतण्याचे आदेश दिले गेले आहेत.
हळदीच्या रंगात रंगलेला नवविवाहित जवान, हातावर अर्धवट मेहंदी आणि हृदयात देशभक्ती — ही मनोज पाटील यांची कहाणी केवळ एका जवानाची नाही, तर संपूर्ण भारताच्या शौर्याची आहे. त्यांच्या पत्नी यामिनी यांनी दिलेला भावनिक पाठिंबा आणि “मी माझं कुंकू पाठवतेय…” अशी तिची भावना भारतीय समाजात देशभक्तीच्या नव्या अध्यायाची सुरुवात करत आहे.