Sayaji Shinde : नाशिकच्या तपोवन (Tapovan) परिसरात सुरू असलेल्या वृक्षप्रेमींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) येथे आले होते. त्यांनी स्पष्ट केले की, नाशिकमधीलच नाही तर महाराष्ट्रात कुठेही झाड तुटू देणे अगदीही मान्य नाही. “झाड म्हणजे आपले आई-बाप आहेत. साधूग्राम (Sadhugram) साठी एकही झाड तुटू देणार नाही. साधू आले गेले, ते आम्हाला फरक पडत नाही, पण कुठला कुंभमेळा आणि कुठले साधूग्राम याची तुलना करता येत नाही,” असे सयाजी शिंदे यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना देखील ठणकावले. सयाजी शिंदे म्हणाले, “मंत्री गिरीश महाजन, तुम्ही वादग्रस्त विधानं करू नका. या जगात झाडंच खरे सेलिब्रिटी आहेत. त्यांना योग्य संरक्षण मिळाले पाहिजे. हिडन अजेंडा किंवा कुणाला फसवण्याचा प्रयत्न करू नका. एकही झाड तुटू देऊ नये.”
सयाजी शिंदे यांनी पुढे म्हटले की, “वृक्ष तोडू नका, ही विनंती आम्ही सरकारकडे वारंवार करत आलो आहोत. तरीही सरकार माघार घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. तशीच वेळ आली तर आम्ही सरकारविरोधात जाऊ. नाशिकच्या पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या बाजूने आम्ही आहोत. सह्याद्री देवराईतील ४० देवराईंच्या वतीने नाशिककरांच्या आंदोलनाला आम्ही पूर्ण पाठिंबा देतो. साधू आले गेले, ते फरक पडत नाही, पण झाड गेल्याने नक्कीच पुढच्या पिढ्यांना फरक पडेल.”
त्यांनी सरकारकडे लक्ष वेधून म्हटले की, झाडं तोडणे हे शिवरायांचा (Shivaji Maharaj) आणि संत ज्ञानेश्वर-तुकारामांच्या (Sant Dnyaneshwar, Sant Tukaram) विचारांचा अपमान आहे. संत महात्म्यांचा आदर राखण्यासाठी झाडं जतन करणे अत्यंत आवश्यक आहे.





