Nashik Tapovan Tree cutting: नाशिक (Nashik) येथील तपोवन झाडतोडीविषयक प्रकरण सध्या राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापवण्याचे काम करत आहे. अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी मनसे (Shiv Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेत, झाडं ही आपल्या आई–बापासमान असल्याचे सांगितले. शनिवारी मनसेने नाशिकच्या तपोवनाबाबत आपली ठाम भूमिका मांडली होती आणि नागरिक आंदोलनही पुकारले होते. सयाजी शिंदे यांनी या आंदोलनात सहभाग घेत वृक्षतोडीला विरोध केला आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट केली.
राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी माध्यमांसमोर वृक्षतोडीवरील आपले मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “ज्या जागी झाडं आहेत ती राहिली पाहिजे, नवीन झाडांची फसवणूक होऊ नये, महाराष्ट्राची वनराई टिकली पाहिजे. झाडांशिवाय मला काही माहिती नाही. सरकार आपलं दुश्मन नाही, त्यांना आपली भूमिका समजली पाहिजे, झाडे वाचली पाहिजेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असल्याने आम्हाला झाडांसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सामील करून हे काम करायचे आहे. झाडे ही आपली आई–बाप आहेत आणि त्यांच्यावर हल्ला केल्यास आम्ही गप्प बसणार नाही.”
सयाजी शिंदे यांनी पुढे म्हटले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही ठाम भूमिका घेतली आहे, त्यामुळे मला आनंद झाला. सगळ्यांनी झाड वाचवण्याचे काम करावे, पर्यावरणवादी नसले तरी त्यांचा विचार करावा, पण झाडे तोडावीत अशी कोणाचीही इच्छा नाही.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटण्याच्या संदर्भात सयाजी शिंदे म्हणाले, “एक्सीबिशन सेंटर होऊ नये आणि जर होणार असेल तर मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी झाडे लावण्याच्या बाबतीत काळजी घ्यावी. झाड तोडून काही मिळणार नाही; झुडप किंवा वेलीवर आपण जगतो. राज ठाकरे हे माणूस म्हणून आवडतात, सगळ्यांनी झाड लावले पाहिजे.”
सयाजी शिंदे यांनी कलाकार आणि नाम फाउंडेशनबद्दलही मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले, “नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी नाटकाला येऊन सांगितले की झाडे वाचवली पाहिजेत. सर्वांनी मिडियासमोर येणे गरजेचे नाही; एकत्र येऊन झाडे लावली आणि वाचवली पाहिजेत.”






