राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंचा पराभव; राज्यात खळबळ

सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीत सर्वांनाच आश्चर्य होईल असे निकाल लागले आहेत. राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांच्यानंतर आता राज्याचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून देसाई व राष्ट्रवादीचे पाटणकर आमनेसामने होते. या लढतीत सत्यजित पाटणकर यांनी १४ मतांनी सरशी मिळवली.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ही निवडणूक अटीतटीची मानली जात होती. त्यामध्ये पाटणकर यांनी बाजी मारली आहे. पाटणकर यांना ५८ तर देसाईंना ४४ मते मिळाली. एकूण १०३ मतदानापैकी १०२ जणांनी मतदान केले होते.

जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात एकूण ४९ मते असून इथे १०० टक्के मतदान पार पडले. यात सगळी मते वैध ठरली असून यात शशिकांत शिंदे यांना २४ तर ज्ञानदेव रांजणे यांना २५ मत मिळाली. अटीतटीच्या या लढतीतीत शिंदे याना अवघ्या एका मताने पराभवाचा सामना करावा लागला. रांजणी हे राष्ट्रवादी पक्षातील बंडखोर उमेदवार आहेत. त्यांचा विजय झाल्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले.

कोरेगाव तालुक्यातून सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिक यांना समान मत पडल्यामुळे या ठिकाणी टाय झाल्याचं पाहायला मिळतं. मतमोजणीत दोघांनाही प्रत्येकी ४५ मतं मिळाली. त्यामुळे अखेर चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये खत्री यांच्या बाजूने कौल आला.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपच्या साथीने ८ मतांनी गुलाल उधळला आहे. त्यांनी माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा पराभव केला.
खटाव तालुक्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे ही विजयी झाले असून नंदकुमार मोरे यांचा पराभव झाला आहे.या निवडणुकीत घार्गे यांना ५६ तर मोरे यांना ४६ मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादीने आणि खास करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खटावमध्ये येऊन जिल्हा बॅंकेसाठी नंदकुमार मोरे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.