Farmer Success: सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातल्या किवळ (Kiwal) गावातील तानाजीराव साळुंखे (Tanajirao Salunkhe) हे नाव सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे. दीर्घकाळ शासनाची सेवा बजावून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आयुष्याचा नवा अध्याय सुरू करत थेट शेतीकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला. कमी पाण्यावर घेता येणारे आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे पीक म्हणून त्यांनी दीड एकरात ‘सातारी आले’ (Satari Aale) लागवड केली आणि थेट 10 लाख रुपये उत्पन्न मिळवत शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
दीड एकरात विक्रमी उत्पादन — साळुंखेंचा अनोखा प्रयोग
शेतीचा प्रत्यक्ष अभ्यास करताना त्यांनी मातीची गुणवत्ता, हवामान, पाण्याचे संसाधन आणि बाजारातील मागणी हे घटक बारकाईने पाहिले. पारंपरिक आणि पाणीखाऊ असलेल्या उसाऐवजी त्यांनी ‘सातारी आले’ हे नगदी पीक निवडले.
1. मुरमाड आणि निचरा होणारी जमीन
2. दोन वेळा नांगरट आणि दोन वेळा फणसणी
3. सेंद्रिय खतांचा भरपूर वापर
4. साऱ्या साडेचार फुटांच्या अंतरावर बेड तयार करून लागवड
एकरी सुमारे 3 लाखांपर्यंत खर्च झाला असला, तरी पिकावर त्यांनी कुठेही काटकसर केली नाही. काटेकोर नियोजन आणि व्यवस्थापनामुळे उत्पादनात मोठी भर पडली. साळुंखेंच्या शेतातून दीड एकरात तब्बल 75 गाड्या आल्याचे उत्पादन मिळाले. आर्थिकदृष्ट्या पाहता त्यांना सुमारे 10 लाखांचे उत्पन्न मिळाले.
तरीही बाजारपेठेत “नवं” आणि “जुनं” असे दर वेगवेगळे ठरवल्याने त्यांना थोडा तोटा बसला. जुन्या आल्याला प्रति गाडी 18 हजार तर नव्या आल्याला 12 हजार असा तफावत असलेला दर मिळाल्याने नफ्यावर परिणाम झाला. पण उत्पादन जास्त मिळाल्याने एकूण प्रयोग यशस्वीच ठरला.
निवृत्तीनंतर शेतीत उतरून केलेला हा यशस्वी प्रयोग आज परिसरात चर्चेचा विषय आहे. अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत असून, आल्याची लागवड, आधुनिक तंत्रज्ञान , पाणी व्यवस्थापन, बाजारपेठेतील ट्रेंड यांसंदर्भात मार्गदर्शन घेत आहेत. साळुंखेंचा अनुभव स्पष्टपणे दाखवतो की योग्य नियोजन, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची जाण असेल तर कमी क्षेत्रातही मोठे यश मिळू शकते. या परिसरात आता आले पिकाबद्दल नव्याने उत्सुकता वाढू लागली आहे.





