साताऱ्यात राडा! 1 मताने पराभव झाल्याने शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले

सातारा । राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा बँक निवडणुकीचे धक्कादायक निकाल समोर आले आहेत. यामुळे मोठ्या नेत्यांना धक्का बसला आहे. साताऱ्यात राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांच्यानंतर आता राज्याचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यात मोठा राडा झाला. शशिकांत शिंदे यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला. यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते ज्ञानदेव रांजणे यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. यामुळे मोठा गोंधळ झाला.

या धक्कादायक पराभवामुळे शिंदे समर्थक प्रचंड संतापले आहेत. स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदे यांचा पराभव झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट पक्ष कार्यालयावरच हल्ला चढवला आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण तापले आहे.

जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात एकूण ४९ मते असून इथे १०० टक्के मतदान पार पडले. यात सगळी मते वैध ठरली असून यात शशिकांत शिंदे यांना २४ तर ज्ञानदेव रांजणे यांना २५ मत मिळाली. अटीतटीच्या या लढतीतीत शिंदे याना अवघ्या एका मताने पराभवाचा सामना करावा लागला. रांजणी हे राष्ट्रवादी पक्षातील बंडखोर उमेदवार आहेत.

त्यांचा विजय झाल्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले. यामुळे याठिकाणी पोलीस दाखल झाले. विधानसभा निवडणुकीत देखील शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. आता दगडफेक प्रकरणी शशिकांत शिंदे यांनी माफी मागितली आहे.

शशिकांत शिंदे यांनी म्हटले की, मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करेन, ज्या नेत्यांनी मला राजकीय क्षेत्रात उभे केले, त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका. ही भूमिका योग्य नाही, मी जाहीर माफी मागतो, असेही त्यांनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.