Satara Crime: भर रस्त्यात मामाची चाकूने निर्घृण हत्या; भाच्याच्या कृतीने सातारा थरारला, धक्कादायक कारण उघड

Satara Crime: सातारा जिल्ह्यातील कराड (Karad Taluka) परिसरातील ओगलेवाडी (Oglewadi Village) येथे दुपारच्या सुमारास एक थरारक घटना घडली. आपल्या मामावर चाकूने सपासप वार करून भाच्यानं त्याची हत्या केली. ‘तू तुझ्या बायकोला का मारलंस?’ असा थेट प्रश्न विचारल्यामुळे वाद चिघळला आणि अखेर या कौटुंबिक रागाची परिणती खुनात झाली. मृताचे नाव शेखर उर्फ बाळू प्रकाश सूर्यवंशी (Balu Survanshi) असून त्याच्यावर 19 गुन्हे नोंदलेले होते. या घटनेनंतर आरोपी आकाश पळसे उर्फ डाबर (Akash Pulse Suspect) पसार झाला असून पोलिस त्याचा तपास सुरू ठेवत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ओगलेवाडीच्या चौकात बाळू सूर्यवंशी उभा असताना त्याचा भाचा अचानक तिथे आला. काही दिवसांपासून दोघांमध्ये सुरू असलेल्या वादातून दोघांची बोलाचाली वाढली आणि अचानक भाच्यानं मामाच्या पाठीवर व पोटावर सलग वार केले. वार घातक ठरल्याने बाळू सूर्यवंशी जागीच कोसळला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.

त्यानंतर नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेतील सूर्यवंशीला तातडीने कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नेले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढे कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. बाळू सूर्यवंशी सराईत गुंड म्हणून कुप्रसिद्ध होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच त्याचे साथीदार रुग्णालयात जमा झाल्याने ओगलेवाडी परिसरात तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला.

दरम्यान, मृताच्या वडिलांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली. आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार मृत सूर्यवंशीवर खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी अशा स्वरूपाचे एकूण 19 गुन्हे दाखल होते आणि त्याच्या हद्दपारीची तयारीही सुरू होती.