Sanjay Raut : लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले असून, त्यासाठी काल मध्यरात्री मतदान घेण्यात आले. विधेयकाच्या बाजूने २८८ मतं पडली, तर २३२ खासदारांनी विरोध दर्शवला. दुपारी १२ वाजता सादर करण्यात आलेल्या या विधेयकावर रात्री उशीरापर्यंत वाद-विवाद आणि गोंधळ सुरू होता. अखेर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली.
या विधेयकावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी पत्रकार परिषद घेत गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत, हे विधेयक मुस्लिमांच्या संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी आणल्याचा आरोप केला.
“मुस्लिम संपत्तीवर कब्जा मिळवण्याचा डाव” – संजय राऊत
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, “हे विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान परदेश दौऱ्यावर रवाना झाले. सरकारने मोठी क्रांती घडवल्याचा देखावा निर्माण केला, मात्र वास्तविकता वेगळी आहे. हे विधेयक मुस्लिमांच्या संपत्तीवर कब्जा मिळवण्यासाठी आणण्यात आले आहे. देशभरात सुमारे अडीच लाख कोटी रुपयांच्या वक्फ मालमत्तेवर सरकारचा नियंत्रण राहावा, यासाठी हा खेळ रंगवण्यात आला.”
“शेवटी हा व्यवहार खरेदी-विक्रीवर येऊन थांबला”
अमित शाह यांनी विधेयकावर स्पष्टीकरण देताना “२०२५ पर्यंत मशिदी, दर्गे, मदरसे यांना हात लावला जाणार नाही, मात्र रिक्त जमिनी विकल्या जातील आणि त्या पैशांतून मुस्लिम महिलांना मदत केली जाईल,” असे म्हटले होते.
यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “शेवटी सरकारचा हेतू मुस्लिम संपत्तीची खरेदी-विक्री हाच आहे. वक्फ मालमत्तेचे रक्षण करण्याच्या नावाखाली हा कायदा आणला गेला असला, तरी प्रत्यक्षात तो मुस्लिम मालमत्तेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे.”
यासंदर्भात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे लवकरच पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.






