Sanjay Raut on PM Modi Retirement : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येत्या सप्टेंबरमध्ये 75 वर्षांचे होणार असून, त्यांच्या वयोमानाचा आणि आधीच ठरवलेल्या संघाच्या नियमानुसार निवृत्त होण्याच्या मुद्द्यावर आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठोस प्रतिक्रिया दिली आहे.
राऊत म्हणाले, “मोदी यांची दाढी पांढरी झाली आहे, डोक्यावर केसही गेले आहेत, त्यांनी जगभर फिरून सर्व सुखं उपभोगली आहेत. आता त्यांना निवृत्त व्हावं लागेल, अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सातत्याने देत आहे. देश आता सुरक्षित हातात सोपवण्याची वेळ आली आहे.”
निवृत्तीचा नियम स्वतःच लावला, इतरांना हटवलं
संजय राऊत यांनी आठवण करून दिली की, वयाच्या 75 वर्षांनंतर निवृत्ती पत्करण्याचा नियम मोदी आणि संघानेच तयार केला होता. पण मोदींनी आपल्या राजकीय फायद्यासाठी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंतसिंह यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना जबरदस्तीने बाजूला केलं. आता तोच नियम मोदींवर लागू करण्याची वेळ आली आहे.
अमित शहा यांच्या वक्तव्यावर टोला
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी निवृत्तीनंतर काय करणार, यावर हलकी टिप्पणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “कोणी निवृत्तीनंतर काय करणार, याची चर्चा आवश्यक नाही. पण दोघांच्याही मनात निवृत्तीचे विचार असणे, हे देशासाठी चांगले संकेत आहेत.” त्यांनी यामध्ये नानाजी देशमुख यांचा आदर्शही दिला.
मोहन भागवतांचे सूचक वक्तव्य
संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनीही याच विषयावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी संघाचे दिवंगत नेते मोरोपंत पिंगळे (Moropant Pingale) यांचा दाखला देत सांगितले, की पंच्याहत्तरीनंतर बाजूला होऊन दुसऱ्यांना संधी द्यावी, असं त्यांचं म्हणणं होतं.






