अकाली दल, शिवसेना हे एनडीएचे महत्वाचे आणि शेवटचे स्तंभ होते- संजय राऊत

दिल्ली | भाजपच्या घटक पक्षातील सहकारी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडल्या आहेत. कृषी क्षेत्राशी संबंधित विधेयकं लोकसभेत मांडली जाणार होती पण त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला.

हरसिमरत कौर बादल यांचा शिरोमणी अकाली दल हा पक्ष आहे. त्यांनी विधेयकांचा विरोध केला असून हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली असल्याचे विधान संजय राऊत यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले की, एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले नाहीत. शिवसेना बाहेर पडली म्हणजे आम्हाला बाहेर पडण्यास भाग पाडण्यात आले होते.

अकाली दल आणि शिवसेना हे एनडीएमधील सर्वात जुने आणि निष्ठावंत पक्ष होते. आम्ही अजूनही जुने संबंध विसरू शकत नाही. आम्ही एनडीएचा महत्वाचा आणि शेवटचा आधारस्तंभ होतो. बाकी टीडीपीचे काही नक्की नसते.

नितीश कुमारही येऊन जाऊन असतात. एकडीएत कृषी विधेयकावर चर्चा व्हायला हवी होती. सर्वपक्षीय तर सोडून द्या पण जर एनडीएमध्ये कृषी क्षेत्राशी संबधित निर्णय होत असेल तर धोरणात्मक चर्चा व्हायला हवी होती, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, या विधेयकामुळे व्यापाऱ्यांचा फायदा आणि शेतकऱ्यांचे नुकसान होईल असे सर्वांचे म्हणणे आहे. तसेच या विधेयकावर महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.