मुंबई व महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणावर अन्याय करत नाहीत – संजय राऊत

मुंबई | रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. गोस्वामी यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात कायद्याने काम चालतं. जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणावर अन्याय करत नाहीत किंवा सूडाने कारवाई करत नाहीत,’ असे राऊत म्हणाले आहे.

याचबरोबर जर कोणी गुन्हा केला असेल आणि तो दडपला असेल आणि त्यासंदर्भातील काही तपासाचे, पुराव्यांचे धागेदोरे हाती आले असतील तर पोलिसांनी कारवाई केली असेल. त्याच्याशी सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा संबंध नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ‘रिपब्लिकने आम्हा सर्वांविरोधात बदनामीची मोहीम चालवली होती. खोटे आरोप केले होते. खोटे आरोप होत असतील तर त्याचाही तपास झाला पाहिजे असे आम्ही म्हटले होते. आता कोण काय म्हणालं याचं स्पष्टीकरण मी देण्यासाठी आलेलो नाही,’ असे यावेळी ते म्हणाले.

अन्वय नाईक प्रकरण काय आहे?
अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. तसेच तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते.

तसेच अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरले होते. अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

विवाहीत अभिनेत्याच्या प्रेमात पडलेल्या पोरीला शक्ती कपूरने घरातून फरफटत आणले होते
दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट? आरोग्यमंत्री म्हणतात…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.