भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील; संजय राऊतांचा भाजपला टोला

शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून शिवसेना खासदार संजय राऊत नेहमीच वेगवेगळ्या भाष्य करताना दिसून येतात. तसेच या मुखपत्राच्या संपादकीयमधून ते भाजपवरही निशाणा साधताना दिसतात. आता पुन्हा एकदा रोखठोकच्या माध्यमातून संजय राऊतांनी भाजप निशाणा साधला आहे.

संजय राऊतांनी परप्रांतीयांच्या मुद्यावर भाष्य केले आहे. ठाण्यातील सहाय्यक आयुक्तांवरील हल्ला आणि साकीनाका बलात्काराच्या निमित्ताने संजय राऊतांनी परप्रांतीयांची भुमिका मांडली आहे. यावेळीच त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील. सध्या भाजपचे वागणे, बोलणे व डोलणे तसेच दिसत आहे, असा टोला संजय राऊतांनी रोखठोखच्या माध्यमातून भाजपला लगावला आहे.

संजय राऊतांनी रोकठोकमध्ये काय म्हटले?
महाराष्ट्रात अधूनमधून परप्रांतीयांच्या विषयाला उकळी फुटत असते. तशी ती आता फुटलेली दिसत आहे. परप्रांतीयांचा विषय हा फक्त एखादे राज्य किंवा मुंबई, बंगळुरू, कोलकातासारख्या शहरांचा राहिलेला नाही. तो राष्ट्रव्यापी विषय बनला आहे. भूमिपुत्रांचा लढा व परप्रांतीयांची समस्या हे दोन्ही वेगळे विषय आहेत.

मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेचे राजकीय पडसाद म्हणे देशभरात उमटले. बलात्कार करणारा आरोपी मोहन चौहाण हा उत्तर प्रदेशातून येथे आलेला आहे. ठाण्यात पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणारा अनधिकृत फेरीवालाही बाहेरचाच होता.

त्यामुळे वादंग माजले. महाराष्ट्रात जगभरातून जे लोंढे वाहत येतात त्याची नोंद कोठेच नाही. ते कोठेही राहतात, काहीही करतात. हे सर्व परप्रांतीय लोक कोठून येतात, काय करतात, त्यांचा आगापिछा काय याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांनी ते काम करावे अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडली,

त्यावर भारतीय जनता पक्षाने मुंबईत आंदोलन केले. खरे तर महाराष्ट्रात राजकारण करणाऱया प्रत्येक राजकीय पक्षाने, सामाजिक संस्थेने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. मुंबईसारख्या शहरातील वातावरण शुद्ध राहावे, सुरक्षित राहावे यासाठी हे आवश्यक ठरते. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडित अशी ही भूमिका आहे, पण भारतीय जनता पक्षाने यावर आंदोलन सुरू केले, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

तसेच गुजरात, आसाम, तामीळनाडू, कर्नाटकात परप्रांतीयांविरुद्ध आंदोलने अनेकदा झालीच आहेत. बेळगावातील मराठी लोकांना आजही परप्रांतीयच समजले जाते व बेळगावातील निवडणुकीत मराठी एकीकरण समितीचा पराभव झाला म्हणून महाराष्ट्रात पेढे वाटणारेच मुंबईत ‘परप्रांतीय’वादास फोडणी देत आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले हे समजून न घेता त्यांचे उधळणे सुरू आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून परप्रांतीयांचा मुद्दा उकरून काढणे हा दळभद्री प्रकार आहे. देश सगळय़ांचाच आहे, पण कायदा-सुव्यवस्था हा राज्यांचा विषय आहे, असे भारतीय घटना सांगते.

आपल्या राज्यात कोणी बाहेरचे येऊन घाण करीत असतील तर घाण करणाऱयांच्या मुसक्या आवळणे हे राज्य सरकारचे काम आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक साळसूद प्रश्न विचारला आहे, परप्रांतीयांना का दोष देता? मराठी लोक गुन्हे करीत नाहीत काय? मराठीद्वेष भाजपातील मराठी नेत्यांच्या रोमारोमांत कसा भिनला आहे ते या एका वाक्यात दिसते!, अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या मंत्र्यांवर ‘ईडी’चा ससेमिरा लावता, मग भाजपचे सर्व पुढारी धुतल्या तांदळासारखे आहेत काय? ‘ईडी’ त्यांच्यामागे का लागत नाही? आर्थिक गुन्हे फक्त शिवसेना, राष्ट्रवादीचेच लोक करतात काय? हे चंद्रकांत पाटलांनी विचारलेल्या प्रश्नाचे रोख उत्तर आहे. भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील! त्यांचे वागणे, बोलणे व डोलणे तसेच दिसत आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बाॅलीवूडची क्वीन कंगणा भिडली थेट हाॅलीवूड स्टार्सला; चोरीवरून थेट फटकारले
१९७१ च्या भारत-पाक युद्धातील भारतीय विजयी रणगाड्यांचा धुराळा येणार रुपेरी पडद्यावर!
निलेश राणेंची संजय राऊतांवर जहरी टीका, म्हणाले, ‘तु जिथे गेलास तिथे शिवसेनेचं तोंड काळं झालं’

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.