Share

Sanjay Raut: एकनाथ शिंदेंच्या दिल्ली भेटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल,म्हणाले, “गुरुपौर्णिमेला अमित शाहांचे चरण धुतले”

Sanjay Raut:  राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दिल्लीत नुकताच झालेला दौरा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अधिवेशन सुरू असतानाही शिंदे यांनी अचानक दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह अनेक भाजप नेत्यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) (Shiv Sena – Thackeray Group) चे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.

गुरुपौर्णिमेचा संदर्भ देत केलेली उपरोधिक टीका

संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला “गुरुपौर्णिमेचा अध्यात्मिक दौरा” अशी उपरोधिक टीका केली. त्यांनी म्हटले की, “धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण धुतानाचे दृश्य दाखवले गेले होते, तसेच आता शिंदेंनी दिल्लीत त्यांच्या ‘गुरु’ अमित शाह यांचे चरण धुवून आशीर्वाद घेतले.” राऊतांनी याच संदर्भात दावा केला की, दोघांमध्ये मुंबईतील मराठी एकजूट कशी फोडता येईल, यावर चर्चा झाली आहे. “तूर्त एवढंच, उर्वरित तपशील लवकरच” असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.

दिल्ली दौऱ्यामागचे संभाव्य कारण

एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा सुप्रिम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर वकिलांच्या भेटींसाठी झाल्याचा अंदाज लावला जात आहे. दुसरीकडे, शिवसेनेच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीनंतर राष्ट्रीय स्तरावर पक्षबांधणीसाठी दिल्लीतील इतर राज्यांतील प्रमुख नेत्यांशीही शिंदेंनी चर्चा केल्याचे समजते.

अमित शाह व राजनाथ सिंह यांच्याशी गाठभेट

दिल्लीत राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्याशी झालेल्या बैठकीचा फोटो समोर आला असून, यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवर आणि आगामी निवडणुकांतील राजकीय समीकरणांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता या भेटी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

ठाकरे बंधूंची युती भाजप-शिंदे गटासाठी डोकेदुखी?

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीतील मेळाव्यात थेट युती जाहीर केली नसली तरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत सहकार्याचे संकेत दिले. त्यामुळे ही युती मुंबई महापालिकेसारख्या महत्त्वाच्या सत्ता केंद्रासाठी भाजप-शिंदे गटासाठी मोठे आव्हान ठरू शकते.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now