अनिल परब बाळासाहेबांची खोटी शपथ कधीच घेणार नाही म्हणत शिवसेनेकडून परबांची पाठराखण

मुंबई: काल सचिन वाझेच्या पत्राने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. सचिन वाझेने पत्र लिहून अनिल परब, अजित पवार आणि अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले. पण आता शिवसेनेने अनिल परब यांची पाठराखण करत सचिन वाझेचे आरोप फेटाळून लावले आहेत.

अनिल परब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ कधीच घेणार नाहीत असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी अनिल परब यांची पाठराखण केली आहे. तुरूंगातून चिठ्ठी लिहायची नवीन फॅशन आलीय असे म्हणत त्यांनी वाझेंच्या पत्राची खिल्ली उडवली. तसेच या माध्यमातून भाजपकडून राज्य सरकारला अस्थीर करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही त्यांनी केला.

सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावर शिवसेना नेते आणि राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब यांनी त्यांची बाजू मांडली आहे.

अनिल परब म्हणतात की मी दोन मुलींची आणि बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे.मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. हवं तर माझी नार्को टेस्ट करा. मी कधीही वाझेंना अशा प्रकारच्या वसुलीचे आदेश दिले नव्हते, असं परब यांनी स्पष्ट केलं.

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी कुठलेही चूकीचे काम करणार नाही. सरकारला बदनाम करण्यासाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने षडयंत्र रचत आहे. असा उलटा आरोप अनिल परब यांनी भाजपवर केला आहे.

भाजपचे नेते दोन तीन दिवस आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून त्यांना माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता, त्यामुळे तिसरी विकेट काढणार, असं भाजपला आधीच माहिती होतं, असंही अनिल परब म्हणाले आहेत.

नेमके काय आरोप आहेत अनिल परब यांच्यावर
अनिल परब यांनी भेंडी बाजारमधील सैफी बुऱ्हानी ट्रस्टतर्फे सुरू असलेल्या भव्य क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाची चौकशी करावी आणि त्यांच्या ट्रस्टीना वाटाघाटी करण्यासाठी माझ्यासमोर आणावे असे सांगीतले. त्यांच्याकडून ५० कोटी रुपये वसूल करण्यासाठी तू प्राथमिक बोलणी करून घे, असे त्यांनी मला त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलवून सांगितले”, असा आरोप सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात केला आहे.

यावर आता निलेश राणे प्रचंड आक्रमक झाले आहेत. ते म्हणताहेत की या प्रकरणाचे धागेदोरे ठाकरे कुटुंबापर्यंत जाणार आहेत. ट्विट करून निलेश राणेंनी त्यांची भूमिका मांडली आहे.

ते म्हणतात की “सचिन वाझेने सांगीतलं अनिल परब पण त्याच्यावर वसुलीसाठी दबाव टाकत होता. अनिल परब बंगल्यातला म्हणजे मातोश्रीचा जवळचा माणूस हे जगजाहीर आहे. त्याचे धागेदोरे ठाकरे कुटुंबापर्यंत जाणारच कारण उद्धव ठाकरे शिंकले तरी रुमाल अनिल परब द्यायचा. स्पॉट नानाचे दिवस फिरले, खूप उड्या मारत होता.”

 

त्यानंतर आता या प्रकरणावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता अनिल परबांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का ?  अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली आहे.

 

 

सचिन वाझेने त्याच्या पत्रात शरद पवार आणि अजित पवारांचेही नाव घेतले आहे. त्यांचे नाव घेऊन सचिन वाझेने गंभीर आरोप केले आहेत. पवार काका पुतण्याचे नाव पत्रात आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. त्यांना पुन्हा सेवेत घेण्याआधी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला सांगितलं की, मला पुन्हा सेवेत घेण्यास शरद पवार यांचा विरोध आहे. तेव्हा गृहमंत्र्यांनी सांगितलं की ते  शरद पवारांचं मन वळवतील आणि त्यासाठी त्यांनी माझ्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली. एवढी मोठी रक्कम देण्यास मी असमर्थता दर्शवली. त्यावर गृहमंत्र्यांनी मला नंतर ही रक्कम देण्यास सांगितलं. 

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नावही या पत्रात आहे. सचिन वाझेच्या पत्रात म्हटलय की, दर्शन घोडावत हा माणूस मला भेटला. तो बोलला की मी अजित पवारांच्या जवळचा आहे. मी गुटखाकिंग आहे. गुटखावाल्याकडून १०० कोटींची व्यवस्था होऊ शकते. असं दर्शन घोडावतने सांगीतल्याचं सचिन वाझे म्हणतो.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बार अँड रेस्टॉरंटमधून पैसे वसूल करण्यास सांगितले. मुंबईत जवळपास १,६५० बार अँड रेस्टॉरंट असतील, प्रत्येकाकडून तीन ते साडे तीन लाख रुपये गोळा कर, असे त्यांनी सांगितले. मी त्यांना म्हटले की, माझ्या माहितीप्रमाणे मुंबईत दोनशेच बार अँड रेस्टॉरंट असतील. शिवाय मी अशी वसुली करणार नसल्याचेही त्यांना सांगितले.

मात्र, ज्ञानेश्वर बंगल्यातील त्यांच्या चेंबरमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या पीएने देशमुख सरांची मागणी मान्य करण्याचा सल्ला मला दिला. मात्र, मी नकार दिला आणि याविषयी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना कळवले. त्यांनी मला असे कोणतेही बेकायदा कृत्य करू नये, असा सल्ला दिला”, असा दावाही वाझे यांनी पत्रात केला आहे.

या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील तीन मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस दलात पुर्ननियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी दोन कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी  केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे यांनी लिहिलं आहे. ते पत्र आता एनआयए कोर्टाला दिलं जाणार आहे.

दरम्यान, या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.या प्रकरणात आता एनआयए बरोबरच आता सीबीआयकडून तपासाला सुरुवात होणार आहे. इतकच नाही तर संबंधित पत्रावरुन मॅजिस्ट्रेटसमोर सचिन वाझे यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. पत्रावरुन वाझे यांनी घुमजाव करु नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
Sachin Waze Ajit Pawar Sharad Pawar

महत्वाच्या बातम्या
शिवसेना मंत्री अनिल परब यांनी मला ५० कोटी वसूल करण्यास सांगीतले; सचिन वाझेचा गंभीर आरोप
देशमुखांनी नियुक्तीसाठी २ कोटी मागीतले, वाझेचा लेटरबॉम्ब;आघाडीच्या ३ मंत्र्यांवर गंभीर आरोप
डाव उलटला! आता परमबीरसिंगही अडकणार? एनआयए परमबीरांचीच चौकशी करणार; हाजीर हो
नेत्यांच्या सभा होतात पण उद्योगांना बंदी; अनिल अंबानीच्या मुलाची ठाकरे सरकारवर बोचरी टीका
अनिल देशमुख प्रकरणात शरद पवारांनी दबाव आणला; मुख्य न्यायाधीशांनीही म्हटलं हे तर दबावतंत्र: जयश्री पाटलांचा आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.