Sanjay Gaikawad Amdar Niwas: मुंबई (Mumbai) येथील आमदार निवासामध्ये झालेल्या प्रकारामुळे शिवसेना (शिंदे गट) (Shivsena Shinde group) चे बुलढाणा (Buldhana) येथील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै रोजी रात्री आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवण्यात आलं होतं. मात्र मिळालेलं जेवण शिळं व दुर्गंधीयुक्त असल्याचा आरोप त्यांनी केला.
गायकवाड यांनी सांगितलं की, डाळ आणि भात यामधून वास येत होता. त्यामुळे त्यांनी थेट कॅन्टीन व्यवस्थापनाला धारेवर धरले. यावेळी ते फक्त बनियन आणि टॉवेलवर बाहेर आले आणि संतापाच्या भरात त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला कानशिलात मारल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बील देऊ नका, मारहाणीचा आरोप
घटनेदरम्यान संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी “कोणीही या जेवणाचे बील भरू नये” असे स्पष्टपणे सांगितले आणि त्या क्षणी त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला कानशिलात मारल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. यापूर्वीही त्यांनी जेवणाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी केल्याचे त्यांनी एबीपी माझा (ABP Maza) या माध्यमाशी बोलताना सांगितले.
सभागृहात मुद्दा उपस्थित करणार
गायकवाड यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, सभागृहात याबाबत आवाज उठवणार असल्याचेही ते म्हणाले. “कॅन्टीनमधील अन्न वारंवार खराब मिळत आहे, ही बाब आता सहन केली जाणार नाही,” असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.






