Sangli Bailgada race: सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्या- ब्रेकफेल जोडीने मैदान गाजवलं, फॉर्च्युनर पटकावली, पुढच्यावर्षी विजेत्याला बीएमडब्ल्यू कारचं बक्षीस

Sangli Bailgada race: सांगलीत (Sangli) रविवारी झालेल्या भव्य श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीत थरार, जोश आणि गर्दी यांचं अफाट मिश्रण पाहायला मिळालं. देशातील सर्वात मोठ्या शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल या बैलजोडीने मैदान गाजवत फॉर्च्युनर (Fortuner Car) गाडी जिंकली. या स्पर्धेचं आयोजन तासगावजवळील कोड्याचा मळा या 500 एकर विस्तीर्ण मैदानावर करण्यात आलं होतं. शर्यतीचे प्रमुख आयोजक चंद्रहार पाटील (Chandrahara Patil) यांनी निकाल जाहीर करत विजेत्या जोडीचं अभिनंदन केलं आणि पुढच्या वर्षी बीएमडब्ल्यू (BMW Car) बक्षीस देण्याची मोठी घोषणा केली.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल जोडी ठरली चर्चेचा विषय

या स्पर्धेत कोल्हापूरच्या शिरोळ (Shirol, Kolhapur) येथील बाळू दादा हजारे (Balu Dada Hajare) यांच्या ‘हेलिकॉप्टर बैज्या’ आणि सांगलीच्या भिलवडी (Bhilwadi, Sangli) येथील पाटील डेअरीच्या ‘ब्रेकफेल’ बैलजोडीने मैदान गाजवलं. विजेते घोषित होताच मैदानात जल्लोषाचा माहोल झाला. शर्यतीसाठी महाराष्ट्रभरातून हजारो बैलगाडी मालक, चाहते आणि बैलगाडी प्रेमी उपस्थित होते.

फॉर्च्युनर गाडीवर हेलिकॉप्टर बैज्या जोडीची मोहर

या स्पर्धेत पहिलं बक्षीस फॉर्च्युनर गाडीचं होतं, जी हेलिकॉप्टर बैज्या व ब्रेकफेल या जोडीने पटकावली. तर दुसरी फॉर्च्युनर गाडी लखन आणि सर्जा या जोडीने जिंकली. कार्यक्रमानंतर चंद्रहार पाटलांनी सांगितलं की, पुढच्या वर्षी श्रीनाथ केसरी शर्यतीसाठी बीएमडब्ल्यू गाडी बक्षीस म्हणून ठेवली जाईल.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती, महिला शर्यतीने लक्ष वेधलं

या शर्यतीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) आणि अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. महिला बैलगाडी शर्यत हे यंदाच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरलं. शिंदे यांनी भाषणात सांगितलं की, “आज येथे रेकॉर्डब्रेक गर्दी जमली आहे. एवढी गर्दी मी कधीच पाहिली नाही. आमचे हे बैल म्हणजे खरेखुरे सेलिब्रिटी आहेत. त्यांच्या जोशातच महाराष्ट्राची परंपरा जिवंत आहे.”

बैलगाडा शर्यतीचा इतिहासातील सर्वात मोठा सोहळा

तासगाव-बोरगाव परिसरातील कोड्याचा मळा या मैदानावर झालेल्या या भव्य सोहळ्यात हजारो बैलगाड्या, ट्रॅक्टर, थार, फॉर्च्युनर, बुलेट आणि दुचाक्यांसह लाखो प्रेक्षक सहभागी झाले. सांगलीतील या स्पर्धेने केवळ राज्यभरच नव्हे तर देशभरातील बैलगाडी शौकिनांचं लक्ष वेधलं. शर्यतीचा बक्षीस वितरण सोहळा मुंबई मंत्रालय (Mantralaya, Mumbai) येथे पार पडणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं.