Sangamner Election 2025: संगमनेर (Sangamner Town) नगराध्यक्षपदाची लढत यंदा पूर्णपणे वेगळ्याच वळणावर गेली आहे. विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या पत्नी मैथिली तांबे (Maithili Tambe) एका बाजूला, तर महायुतीचे आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्या भावजयी सुवर्णा खताळ (Suvarna Khatal) दुसऱ्या बाजूला थेट रिंगणात आहेत. त्यामुळे या दोन गटांची राजकीय प्रतिष्ठा धोक्यात आल्यानं संगमनेरचा रंग अधिक चुरशीचा झाला आहे.
बाळासाहेब थोरातांच्या भगिनी उतरल्या मैदानात
या लढतीला आणखी गुंतागुंत निर्माण झाली आहे कारण माजी आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr Sudhir Tambe) यांच्या पत्नी आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या भगिनी दुर्गा तांबे (Durga Tambe) यांनीही उमेदवारी नोंदवली आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये तांबे–थोरात घराण्याचे वर्चस्व, तांबे–खताळ प्रतिस्पर्धा आणि नातेवाईकांची राजकीय झुंज असा तिहेरी संघर्ष आकार घेत आहे. काँग्रेसने अधिकृत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समिकरणं आणखी गुंतली आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख झाल्यानंतरच खरी दिशा समोर येणार आहे.
बर्डे–मोरे–पवार आमनेसामने, 12 उमेदवारांनी वाढवली चुरस
राहुरी नगराध्यक्षपदासाठी तब्बल 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने स्थानिक राजकारण तापलं आहे. सखाहरी शांताराम बर्डे, राहुल बर्डे, जनसेवा मंडळाचे भाऊसाहेब मोरे, भाजपचे सुनील पवार, वंचित बहुजन आघाडीचे बापुसाहेब माळी, ईश्वर मासरे आणि मृणाल मोरे अशा विविध गटांच्या उमेदवारांमुळे नवा राजकीय तिढा निर्माण झालेला दिसतो.
‘गाडेकर विरुद्ध गाडेकर’ घरातीलच टक्कर लक्षवेधी
राहाता नगराध्यक्षपदाच्या मैदानात ‘घरातूनच घरावर’ अशी सरळ भिडंत होत आहे. महायुतीकडून डॉ. स्वाधिन गाडेकर तर महाविकास आघाडीकडून धनंजय गाडेकर रिंगणात उतरले आहेत. ठाकरे गटाचे राजेंद्र पठारे, राष्ट्रीय जनमंचचे बाळासाहेब गिधाड, आपचे रामनाथ सदाफळ, बसपचे अनिल पावटे आणि अपक्ष भानुदास गाडेकर व तुषार सदाफळ असा एकूण ९ उमेदवारांचा तगडा पॅनेल तयार झाल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.






