Sandip Deshpande On MNS Mira Bhayandar Morcha: मिरा भाईंदर (Mira Bhayandar) शहरातील व्यापारी संघटनेकडून माफी मागण्यात आल्यानंतरही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) मीरारोड (Mira Road) परिसरात मराठी अस्मितेसाठी नियोजित मोर्चा काढण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे राज्यभरात लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह ठाकरे गटाच्या शिवसेना (Shiv Sena Thackeray Group) पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या. त्यामुळे मिरा भाईंदर परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या नोटिशींचा मनसेने तीव्र निषेध नोंदवला आहे.
आज सकाळी पोलिसांनी अविनाश जाधव यांच्यासह काही शिवसैनिक (Shiv Sainiks) आणि मनसैनिकांना (MNS Workers) ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आणि वातावरण अधिकच तापले.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी “मोर्चाला आम्ही परवानगी दिली होती, फक्त रूट बदलायला सांगितला होता” असे स्पष्टीकरण दिले. मात्र यावर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी तीव्र प्रतिक्रिया देत फडणवीस यांच्या वक्तव्याचा पूर्णपणे इन्कार केला.
ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी खोटं बोलू नये. पोलीस मोर्चाला परवानगी द्यायला तयार नव्हते. मीरा रोडमध्ये (Mira Road Incident) घटना घडली, व्यापाऱ्यांनी तिथेच मोर्चा काढला. मग आम्हाला घोडबंदर (Ghodbunder) येथे मोर्चा काढायला का सांगितलं? हेच सिद्ध करतं की पोलीस मोर्चा रोखू इच्छित होते.”
देशपांडे पुढे म्हणाले, “तुम्ही गुजरात्यांना (Gujarati Traders) परवानगी दिली, आमच्यावर गुन्हे दाखल करणार होतात, आम्हीही तयार होतो. पण आम्ही खोटं पसरवणार नाही. आता महाराष्ट्रातील मराठी माणूस मीरारोडकडे चाल करतोय. पाहूया जेलची क्षमता जास्त आहे की मराठी माणसांची संख्या.”
या मोर्च्याच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही जमावबंदी आदेश झुगारत अनेक संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांशी कार्यकर्त्यांची धक्काबुक्की झाली, तसंच ठिय्या आंदोलनाचाही प्रयत्न करण्यात आला.