Sandeep Kshirsagar on Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये ‘नीट’ तयारी करणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक छळ (Sexual Harassment) झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी विजय पवार (Vijay Pawar) हा आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गटाचे (NCP) नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केला होता.
मुंडेंच्या आरोपांवर क्षीरसागर यांचा थेट पलटवार
या आरोपांना प्रत्युत्तर देताना संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) म्हणाले की, “मी मुंडे साहेबांसारखा १५० दिवस पळून गेलो नाही. जे काही घडलं ते चुकीचं आहे, पण पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. आरोपी माझा ओळखीचा असला तरी मी कायद्यानुसार कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.”
“एसआयटी चौकशीची मागणी केली आहे, त्याला मी पूर्ण सहमत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून याप्रकरणी योग्य ती पावलं उचलली जात आहेत. गुन्हा दाखल करायला १० दिवसही लागले नाहीत. पीडितेची तक्रार मिळताच गुन्हा दाखल करण्यात आला,” असंही ते म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तिक टीका
धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावरून टीका करत असताना स्वतःच्या अनुभवाचं उदाहरण दिलं होतं. यावर उत्तर देताना क्षीरसागर म्हणाले, “मुंडे साहेबांचं मंत्रीपद गेलं आहे, त्यामुळेच त्यांना दुःख होतंय. मस्साज प्रकरणात त्यांनी आक्रमक भूमिका का घेतली नाही?”
संदीप क्षीरसागर म्हणाले, “मी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांमध्ये वावरतो. चहाच्या टपरीवर भेटतो, संवाद करतो. पीडितेकडे जाण्याचा विचार होता, पण परिस्थिती पाहता सध्या जाणं टाळलं.”
यावेळी बोलताना त्यांनी बीडचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचाही उल्लेख केला. “बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा आहेत. त्यांनी धनंजय मुंडेंनी यावर विश्वास ठेवायला हवा होता,” असं सूचक विधान त्यांनी केलं. या प्रकरणावरून बीडच्या राजकारणात खदखद सुरु असून, स्थानिक स्तरावर सत्ताधारी गटांमध्ये दबाब आणि आरोप-प्रत्यारोप रंगताना दिसत आहेत.