मलाही समीर वानखेडेंनी १०-१५ कोऱ्या कागदावर सह्या करायला लावल्या, आणखी एका पंचाचा गंभीर आरोप

मुंबई। एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आधीच समीर वानखेडे यांच्यांवर आरोपांची झोड उठवली जात आहे. तर त्यात आता आणखी एका नवीन आरोपाची भर पडली आहे. पंच प्रभाकर साईल याने केलेल्या लाचखोरीच्या आरोपानंतर आता खारघरमधील एका जुन्या प्रकरणातील अजून एक पंच समोर आलाय.

शेखर कांबळे याने एनसीबीविरोधात गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दहा कोऱ्या कागदांवर माझ्या सह्या घेतल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. खारघर येथील एका प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला पंच बनवलेलं आहे. ८०/२०२१ या नायजेरियन ड्रग्स पेडलर नायजेरियन नागरिकांवर झालेल्या कारवाईचं हे प्रकरण आहे.

या प्रकरणात ज्या दोघांना पकडण्यात आलं होतं, त्यांच्याकडं कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नव्हतं. असं असतानाही त्यांच्याकडं ६० ग्रॅम ड्रग्ज सापडल्याचं नमूद करण्यात आलं, असं कांबळे यांनी सांगितलं. नायजेरियन प्रकरणात शेखर कांबळे व त्याच्या एका मित्राला पंच साक्षीदार बनवण्यात आलं होतं. दहा कोऱ्या कागदावर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या.

याबद्दल विचारणा केली असता ‘आम्ही त्यावर नंतर लिहू’ असं त्यांना सांगण्यात आलं होतं. एनसीबीच्याच एका अधिकाऱ्यानं काल एक निनावी पत्र व्हायरल केलं आहे. त्यात खारघरच्या प्रकरणाचा उल्लेख आहे. त्यामुळं घाबरलेल्या शेखर कांबळे यानं आज मीडियासमोर येण्याचा निर्णय घेतला. मला काल अनिल माने यांचा रात्री फोन आला. पण मी तिथे गेलो नाही, मला आता भीती वाटतेय.

कोर्टात केस जाईल तेव्हा न्यायाधीश जे विचारतील तेव्हा मी काय उत्तर देणार? कारण मी पंचनामा वाचलेला नाही. म्हणून मी आता समोर आलोय. समीर वानखेडे मला १९ तारखेपर्यंत फोन करायचे, खूप वेळा फोन करायचे. मी नायजेरीयन नागरिकांची माहिती द्यायचो. पण त्यांनी मला अंधारात ठेवलं. मी पुढील सगळ्या चौकशीसाठी तयार आहे, असंही शेखर कांबळे याने सांगितलं.

पुढे कांबळे म्हणाले की, मला पंचनामा वाचायला दिला नाही. जी कारवाई केली गेली ती बोगस होती. त्यात काही सापडलं नव्हतं. मात्र, ६० ग्राम एमडी सापडल्याचं दाखवण्यात आलं होतं. मी आणि माझा एक मित्र प्रचंड दहशतीत आहोत. काल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पेपरमध्ये या केसचा उल्लेख होता. ज्यात ६० ग्राम एमडी पकडल्याचं समजलं, त्यामुळे मी घाबरलो आहे, असं शेखर कांबळेम्हणाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.