“सचिन वाझे हे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रिपोर्टिंग करायचे, तसेच ते आदित्य ठाकरेंसोबत ऑनकॉल होते”

सचिन वाझे प्रकरणामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे.  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी येथे सापडला होता.

त्यामुळे या प्रकरणात सचिन वाझेंना एनआयएकडून अटक करण्यात आल्यानंतर रोज वेगवेगळे खुलासे होत आहे.  असे असताना भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

सचिन वाझे हे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रिपोर्टिंग करायचे, परमबीर सिंग यांना ते विचारायचे नाही, तर ते आदित्य ठाकरेंसोबत ऑनकॉल होते, म्हणूनच त्यांना वाचवण्याचे प्रयत्न होत होते, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला देत असलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

सचिन वाझे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी राहत होते? ते वर्षावर का राहायचे? वर्षावर राहायची परवानगी सचिन वाझेंना कोणी दिली?, असे सवाल सुद्धा नितेश राणे यांनी उपस्थित केले आहे.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या सुनावणीत एनआयएने  सांगितले की, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि पोलीस कर्मचारी विनायक शिंदे हे मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात सहभागी होते.

तसेच हिरेन यांची हत्या कोणी केली त्यांच्या मागचा हेतू काय होता, इथंपर्यंत तपास पोहचला आहे. एनआयएने विनायक शिंदे आणि नरेश गोर याला ७ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.