Share

Rupali Thombare : तुमचं स्वागत करू! अजित पवारांच्या कारवाईनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून रुपाली ठोंबरेंना थेट ऑफर

Rupali Thombare : राज्यातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) मोठी हालचाल सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करताच दोन नावं गायब दिसली.   रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) आणि अमोल मिटकरी (Amol Mitkari). या दोघांना प्रवक्तेपदावरून वगळण्यात आलं असून, या निर्णयानंतर पक्षात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या हकालपट्टीनंतर लगेचच रुपाली ठोंबरे यांना पहिली राजकीय ऑफर मिळाली आहे आणि तीही थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv Sena Thackeray Group) गटाकडून. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी खुलं वक्तव्य करत सांगितलं. “रुपाली ठोंबरे माझी चांगली मैत्रीण आहे. तिने आमच्या शिवसेनेत यावं, आम्ही तिचं स्वागत करू.”

राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद आणि हकालपट्टीचा धक्का

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन महिला नेत्यांमध्ये तणाव वाढलेला दिसत होता. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि रुपाली ठोंबरे यांच्यातील मतभेद शिगेला पोहोचले होते. या वादाचाच परिणाम ठोंबरेंच्या हकालपट्टीच्या स्वरूपात दिसून आला. पक्षविरोधी विधानं आणि थेट टीका यांमुळे त्यांना डच्चू दिल्याचं बोललं जातंय.

शनिवारी रुपाली ठोंबरेंनी अजित पवारांची भेट घेऊन आपलं स्पष्टीकरण दिलं, मात्र त्यानंतरही निर्णय बदलला नाही. उलट अजित पवारांनी त्यांचं डिमोशन केलं आणि त्याच वेळी मारहाण प्रकरणात अडकलेले सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना पुन्हा प्रवक्तेपद दिलं गेलं. त्यामुळे अनेकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

सुषमा अंधारेचा खुला प्रस्ताव

या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, “रुपाली ठोंबरे ही निडर, स्वच्छ प्रतिमेची महिला आहे. तिच्याकडे ईडी किंवा सीबीआयसारखं कोणतंही बॅगेज नाही. अशा लोकांना कोणताही पक्ष आपल्यात घ्यायला इच्छुक असतो. मात्र जर तिला तिच्या पक्षात संधी मिळत असेल, तर तिनं तिथेच काम करत राहावं.” त्यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चेला अधिक रंग चढला आहे.

ठाकरे गटात प्रवेशाची चर्चा

राष्ट्रवादीतून हकालपट्टी झाल्यानंतर रुपाली ठोंबरे पुढे कोणता निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाने दिलेली ऑफर स्विकारली, तर ही एन्ट्री राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणं निर्माण करू शकते.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now