Share

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर संतप्त ; मालेगावातील चिमुरडी प्रकरणावर महिला आयोगाची कडक भूमिका, दोषींना फाशीची मागणी

Rupali Chakankar : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि खुनाच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. गावातील विजय संजय खैरनार नावाच्या 24 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची दगडांनी ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून कठोर शिक्षेची मागणी होत आहे.

या भीषण प्रकरणात राज्य महिला आयोगाने तातडीने कारवाईचा धनी घेतला असून, अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी संताप व्यक्त करत दोषीला फाशीची शिक्षा देण्याची ठाम मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे अमानवी कृत्य माणुसकीला घोर कलंक लावणारे असून, या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी यासाठी आयोग सातत्याने पाठपुरावा करणार आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, नवीन कायद्यांनुसार अशा लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा अधिक कठोर करण्यात आली आहे. महिला आयोगाने यापूर्वीही अनेक प्रकरणांत न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका निभावली असून, तीन प्रकरणांत गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाल्याचे त्यांनी सांगितले. मालेगावातील ही घटना “हृदय पिळवटून टाकणारी” असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्या मुलीने सहन केलेल्या वेदना पाहता सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी जनतेची मागणी आहे. चाकणकर यांनी सांगितले की, त्या पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकणार आहेत आणि त्यानंतर पुढील पावले उचलली जातील.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ मालेगाव शहरात संपूर्ण बंद पाळण्यात आला. मुस्लिम बहुल परिसर असलेल्या पूर्व भागात सर्व दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या, तर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली.

माजी आमदार आसिफ शेख (Asif Shaikh) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सौदी अरेबिया (Saudi Arabia) प्रमाणे कठोर कायदा महाराष्ट्रात लागू करावा, अशी मागणी केली. अशा कायद्यानं भविष्यातील गुन्हे रोखले जातील, असा त्यांचा विश्वास आहे. राज्यातील अनेक सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिक या प्रकरणावर न्यायाची मागणी करत आहेत. दोषींना कठोरात कठोर शिक्षा देऊन मुलीला न्याय मिळावा, अशी सर्वांची एकमुखी भावना आहे.

 

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now