दहावीत ९९.६० टक्के गुण मिळवलेल्या ऋतुजाच्या पंखाना बळ देण्यासाठी अमोल कोल्हे सरसावले

नारायणगाव | दहावीच्या परीक्षेत ९९.६० टक्के गुण मिळवून डॉक्टर होण्याचे स्वप्न तिने पाहिले. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील बोतार्डे-आमलेवाडी येथील ऋतुजा प्रकाश आमले हिचे शैक्षणिक पालकत्व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वीकारले आहे.

डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन त्यांनी केले आहे. तसेच तिला ऑनलाईन शिक्षण घेण्यात यावे यासाठी आपल्या जगदंब प्रतिष्ठानतर्फे अँड्रॉइड मोबाईल भेट दिला.

जुन्नर तालुक्यातील आदिवासी ‘पेसा’ क्षेत्रातील आमलेवाडी- बोतार्डे येथील ऋतुजा आमले हिने दहावीच्या परीक्षेची तयारी करताना घराच्या भिंतीवर ९९.९९ टक्के गुण मिळवून डॉक्टर होण्याची इच्छा प्रकट केली होती.

त्याप्रमाणे तिने दहावीत ९९.६० टक्के पाडून आपले पहिले स्वप्न पूर्ण केले. अतिशय गरीब कुटुंबातील ऋतुजाच्या गुणवत्तेची दखल घेत अमोल कोल्हेनी तातडीने मदत पाठवली.

जगदंब प्रतिष्ठानचे विजय कोल्हे, धर्मेंद्र कोरे, अतुल कांकरिया, अतुल आहेर, जयेश कोकणे, शेखर शेटे, आशिष हांडे, तेजस झोडगे आदी सहकाऱ्यांना तीच्या घरी पाठवले. विजय कोल्हे यांच्या हस्ते तीला ऑनलाईन अभ्यासासाठी आवश्यक असणारा अँड्रॉइड मोबाईल भेट देण्यात आला.

तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमोल कोल्हे यांनी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ऋतुजा हिचे पालकत्व स्वीकारल्याबद्दल तिच्या पालकांनी अमोल कोल्हे यांचे आभार मानले आहेत.

ग्रामीण भागातील विशेषतः बोतार्डेसारख्या आदिवासी क्षेत्रातील हालाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील एक मुलगी कष्टाने शैक्षणिक यश मिळवते, डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचा निश्चय करते, हीच मुळात कौतुकास्पद बाब आहे.

अशा गुणवान व आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या ऋतुजा हिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचं भाग्य मला लाभलं, ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे, असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.