Rohit Pawar on Sanjay Gaikwad : बुलढाणा (Buldhana) येथील शिवसेना (Shivsena – Shinde group) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीनमधील जेवण निकृष्ट असल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना सध्या चर्चेत आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विधानसभेतही पडसाद उमटले. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे (NCP – Sharad Pawar group) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
सरकार गायकवाडांच्या पाठीशी
रोहित पवार म्हणाले की, या प्रकारात संजय गायकवाड यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, कारण सरकारमधील नेते व पदाधिकारी त्यांच्याच पाठीशी आहेत. परंतु सामान्य नागरिकांसाठी हे सरकार कधीच उभं राहत नाही, अशी टीका त्यांनी महाराष्ट्र सरकारवर केली.
गायकवाडांचा बचाव आणि कायद्याचा हवाला
संजय गायकवाड यांनी स्वतःच सांगितलं की, ही एक “छोटीशी मारहाण” होती आणि हे प्रकरण फक्त एनसी (नॉन-कॉग्निजेबल) प्रकारात येते. त्यामुळे त्यावर मोठी शिक्षा लागूच होत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. या विधानावरही रोहित पवार यांनी रोष व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिक्षण खात्यातील प्रलंबित प्रकरणांबाबत महाविकास आघाडी सरकारला दोष दिला. यावर रोहित पवार म्हणाले की, “फडणवीस कधी कधी खोटं बोलतात. मागील १० महिन्यांत त्यांनी काय केलं? केवळ राजकारण करत शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवले.”
‘होळकर योजना’तही भ्रष्टाचाराचा आरोप
राज्य सरकारने सुरू केलेल्या श्रीमंत यशवंतराव होळकर योजना संदर्भातही रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले. “काम झाले नसतानाही बिलं काढली गेली आहेत. फक्त बिलांमधून पैसे खाण्याचा धंदा सुरू आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.