Share

Rohit Pawar on Manikrao Kokate : शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारा कृषीमंत्री, महाराष्ट्र त्यांच्या राजीनाम्याची वाट पाहतोय, पवारांचा सणसणीत हल्लाबोल

Rohit Pawar on Manikrao Kokate  :  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (NCP ) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. लातूर (Latur) येथे शेतकरी पदाधिकाऱ्यावर झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ज्या पत्त्यांच्या खेळामुळे हा गोंधळ झाला, त्या ‘खेळणाऱ्यां’वर कारवाई करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

“शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या मंत्र्यांचा महाराष्ट्र कंटाळला”

रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटले की, “राज्य सरकारने लोकभावनेचा आदर केला पाहिजे, आणि शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या मंत्र्यांनी स्वतःहून पद सोडावे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या राजीनाम्याची वाट पाहतोय.”

‘रमी खेळणाऱ्या’ मंत्र्यांवर रोहित पवारांचा आरोप

माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी एक्स (Ex) या प्लॅटफॉर्मवर रोहित पवार यांनी शेअर केला होता. त्यानंतर राज्यभरात राजकीय खळबळ उडाली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना कोकाटे म्हणाले होते की, “मी युट्युब पाहत असताना ती जाहिरात स्किप करत होतो.”

मात्र, हे स्पष्टीकरण फोल असल्याचे आता स्पष्ट होत आहे. कारण जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आणखी दोन व्हिडीओ समोर आणले आहेत. या व्हिडीओमध्ये माणिकराव कोकाटे प्रत्यक्षात ऑनलाईन पत्ते खेळताना दिसत आहेत, असा त्यांचा ठाम दावा आहे.

“कोकाटे जाहिरात स्किप करत नव्हते, तर जुगारच खेळत होते”

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माणिकराव कोकाटे जाहिरात नाही तर ‘जंगली रमी’ हा ऑनलाईन जुगारच खेळत होते. स्क्रीनवर कुठला पत्ता कुठे सरकवला हे स्पष्ट दिसत आहे.” तसेच, “तुम्हाला आणखी पुरावे हवेत का? मागाल तेवढे देतो,” असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

तटकरे यांची सूचक प्रतिक्रिया

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “माणिकराव कोकाटे यांच्या वर्तनाबाबत पक्ष खूप नाराज आहे. योग्य निर्णय लवकरच घेतला जाईल,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे कृषीमंत्र्यांचे मंत्रिपद धोक्यात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now