‘आमच्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायम १ नंबरच राहतील, कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नाही’

मुंबई | ‘आमच्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायम १ नंबरच राहतील, कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नाही’. अस म्हणत राष्ट्रवादीचे नेते रोहीत पवार केंद्राच्या गृह खात्यातर्फे देशातील १० अव्वल पोलीस ठाण्यांच्या यादीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

 

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या, अभिनेत्री कंगना राणावत आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या प्रकरणामुळे भाजप आणि महाविकास आघाडी असा वाद निर्माण झाला होता. तसेच १६ एप्रिलला दोन साधूंसह त्यांचा वाहनचालकाची पालघर येथील गडचिंचले गावाजवळील चेक नाक्याजवळ सशस्त्र जमावाने हत्या केली होती.

 

यामुळे, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. भाजपने शिवसेनेबरोबर महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते. याप्रकारात सरकारने वेळोवेळी मुंबईसह महाराष्ट्र पोलिसांची कारवाई कायद्याच्या कक्षेत चालते असे ठणकावले होते.

 

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या. ठाकरे सरकारने ही सुडबुद्धीने केलेली कारवाई आहे असा आरोप भाजपा नेत्यांनी केला. केंद्रात भाजपच सरकार आहे. आणि केंद्राच्या गृह खात्यातर्फे देशातील १० अव्वल पोलीस ठाण्यांची नावं जाहीर करण्यात आली. मात्र यात राज्यातील एकाही पोलीस ठाण्याचा समावेश नाही.

 

यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते रोहीत पवार यांनी फेसबुक पोस्ट करत लिहले आहे की, महाराष्ट्र पोलीस दलाच्या कौशल्यपूर्ण कार्याची, कार्यक्षमतेची चर्चा राज्यातच नाही तर देशात आणि जगात होत असते. मुंबई पोलीस दल तर जगातील उत्तम पोलिसांपैकी एक आहेत, असे गौरवोद्गार उच्च न्यायालयाने नुकतेच काढल्याचे आपण पाहिले.

 

कोविडच्या कठीण प्रसंगात तर स्वतःच्या जिवाची अन कुटुंबाची पर्वा न करता महाराष्ट्र पोलिसांनी अहोरात्र सेवा बजावत प्रत्येकाला अभिमान वाटेल असं काम केलं. देशात सर्वोत्तम कायदा व सुव्यवस्था ही महाराष्ट्रात आहे, हे सर्वजण मान्य करतात.

 

हे एवढ्यासाठी सांगतोय की, केंद्राच्या गृह खात्यातर्फे नुकतीच देशातील १० अव्वल पोलीस ठाण्यांची नावं जाहीर करण्यात आली मात्र यात राज्यातील एकाही पोलीस ठाण्याचा समावेश नसल्याचं पाहून आश्चर्य वाटलं.

 

विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून असं होतंय. मुंबई पोलिसांची तुलना तर जगातील सर्वोत्तम अशा स्काॅटलंड यार्ड पोलिसांशी होते. राज्यात पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येकाचं म्हणणं ऐकूण घेतलं जातं, त्यांच्या तक्रारीची नोंद केली जाते आणि कोणताही दुजाभाव न करता योग्य तपासही केला जातो. गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं दिसू नये म्हणून एफआयआर नोंदवायचाच नाही, असा प्रकार महाराष्ट्रात घडत नाही. असं असतानाही राज्यात अव्वल पोलीस ठाण्यांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलीस ठाण्याचं नाव नाही, हे काही मनाला पटत नाही.

 

पण एक मात्र खरंय देशातील टाॅप १० पोलीस ठाण्यांच्या जाहीर केलेल्या यादीत राज्यातील एकाही पोलिस ठाण्याचा समावेश नसला तरी माझ्या महाराष्ट्र पोलिसांवर माझा आणि इथल्या जनतेचा विश्वास आहे. आमच्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायम ‘नंबर १’ वर आहेत आणि यापुढंही राहतील, असा विश्वास आहे. त्यासाठी कोणत्याही सर्वेक्षणाची किंवा यादीची गरज वाटत नाही.

जय महाराष्ट्र!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.