Share

Pune Kothrud Crime : सुजात आंबेडकरांसह रोहीत पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या, कोथरुड पोलिसांकडून मुलींच्या छळाचा आरोप, पुण्यात नेमकं काय घडलं?

Pune Kothrud Crime: पुणे (Pune) शहरातील कोथरुड (Kothrud) पोलीस ठाण्यावर दलित मुलींवर छळ केल्याचा आरोप होत असून, हे प्रकरण आता अधिक गंभीर वळण घेत आहे. रविवारी या मुद्द्यावर सामाजिक संघटना आणि राजकीय नेते मैदानात उतरले. पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास चालढकल केल्याने रोहित पवार (Rohit Pawar), सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar), अंजली आंबेडकर (Anjali Ambedkar) आणि इतर कार्यकर्ते यांनी पोलीस आयुक्तालयात (Pune Police Commissionerate) ठाण मांडले. तब्बल साडेतीन वाजेपर्यंत या सगळ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, पण एफआयआर नोंदवण्यात आला नाही.

नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) एका प्रकरणाच्या तपासासाठी तीन दलित मुलींना कोथरुड पोलिसांनी रिमांड रूममध्ये नेलं. तिथं तब्बल पाच तास त्या मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ झाला, असा गंभीर आरोप आहे. पोलिसांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्यासोबतच लैंगिक स्वरूपाचे अपमानास्पद वक्तव्य केल्याची माहिती आहे. काही कार्यकर्त्यांच्या सांगण्यानुसार, मुलींचा विनयभंगही करण्यात आला.

या प्रकाराविरोधात शहरातील सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. रविवारी रात्री अनेकजण आयुक्तालयात पोहोचले. अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील (Manoj Patil) आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (Ranjankumar Sharma) यांच्याशी चर्चा झाली, पण कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.

रोहित पवार आणि सुजात आंबेडकर यांचा संताप

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, मागासवर्गीय मुलींवर कोथरुड आणि छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी जातीवाचक शेरेबाजी करत मारहाण केली. दोन दिवसांपासून एफआयआरची मागणी केली जात असली तरी पोलिस याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांनी विचारलं की, संबंधित व्हीआयपी केससाठी दबाव कुणी आणला? संबंधित निवृत्त पोलीस अधिकारी कोण आहे? झिरो पोलिस असलेल्या महिलेवर कोणती कारवाई केली जाणार?

सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करत म्हटलं की, दलित मुलींवर अन्याय झाल्याची तक्रार असूनही अ‍ॅट्रोसिटी कायद्यानुसार तक्रार घेण्यास पोलिस टाळाटाळ करत आहेत. सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलीस यंत्रणाच बघ्याची भूमिका घेत आहे.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम (Sambhaji Kadam) यांनी आरोप फेटाळले असून, तपासात काही तथ्य आढळल्यास कारवाई करु असे सांगितले आहे. आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) आणि त्यांच्या नेतृत्वाखालील पथक काय भूमिका घेतं, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्य महिला आयोग आणि विविध सामाजिक संघटनांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून, संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, हे आजच्या दिवसभरात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now