Rohini Khadse on Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शनिमंदिरात (Shani Mandir) जाऊन शनिदेवाची पूजा केली आणि सर्वांच्या आयुष्यातील साडेसाती दूर होवो, अशी प्रार्थना केली. मात्र, त्यांच्या या पूजेला आता विरोधकांनी लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट (Sharad Pawar Group) यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आली असून महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी कोकाटेंवर बोचरा हल्लाबोल केला आहे.
“शनीला नवस करायच्या आधी शेतकऱ्यांना वाचवा”
रोहिणी खडसे यांनी आपल्या समाजमाध्यमांवर पोस्ट करत म्हटलं, “विरोधकांच्या आरोपातून सुटका मिळावी म्हणून माणिकराव कोकाटे यांनी शनिदेवाच्या चरणी साकडं घातलं आहे. मात्र ते स्वतःच शेतकऱ्यांच्या संकटांची खरी साडेसाती आहेत. त्यांच्या मंत्रिपदामुळेच शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे.” याच विधानातून त्यांनी थेट कोकाटे यांचं नाव न घेता त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार केला.
ऑनलाइन रमी प्रकरण आणि मंत्रिपद धोक्यात?
अलीकडेच विधानसभेत माणिकराव कोकाटे रमी खेळताना (Online Rummy) आढळल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकारामुळे विरोधक आणि जनतेतून मोठा संताप व्यक्त करण्यात आला. शेतकरी संघटनांनी आणि विरोधी नेत्यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पुण्यात गोपनीय बैठक घेतली. या चर्चेत कोकाटे यांचा राजीनामा घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. याशिवाय कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सरकारविरोधी वक्तव्ये केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाराज असल्याचे समजते.
आज संध्याकाळपर्यंत कोकाटे यांच्याविषयी निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार हे आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा करून निर्णय घेतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.