‘शेतकऱ्यांना चिरडून मारले याला जबाबदार कोण? त्यांना देशद्रोही, म्हणल्याबद्दल मोदींनी माफी मागावी’

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला. नरेंद्र मोदींनी कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा विजय झाला आहे. आज ते देशाला संबोधित करत आहेत. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले आहे.

अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत होते. यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, काळे कृषी कायदे मागे घेणे हा शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक विजय आहे.

पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकामुळेच हा निर्णय घेतला. पण या आंदोलनात ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला, शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्यात आले याला जबाबदार कोण? तसेच अन्नदात्यांना देशद्रोही, खालिस्तानी म्हणल्याबद्दल मोदींनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दिल्लीतील या आंदोलनात शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावली. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेतकऱ्यांनी वर्षभरापासून आपले आंदोलन सुरूच ठेवले. या आंदोलनात लोकांनी प्राणाची आहुती दिली, शेतकरी मागे हटले नाही. शेवटी सरकारला कायदा रद्द करावा लागला.

7 वर्षांत मोदींनी कधीही पाय मागे घेतला नाही. आता, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणुका समोर आहेत. त्यामुळेच, पराभवाच्या भीतीने मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला, असेही अनेकांनी म्हटले आहे.

दरम्यान, हे तीन कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले होते. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान तीनही वादग्रस्त कायदे संसदेद्वारे मागे घेतले जातील. मोदींनी शेतकऱ्यांना शेतात परत जाण्याचे आवाहनही केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.