Story: एखादी कमी शिक्षण असलेली महिला स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करणार म्हंटल की, आपल्याला पापड, लोणची, खानावळ यांसारखे गृहउद्योग आठवतात. मात्र औरंगाबाद येथील महिला उद्योजिका पार्वतीबाई फुंदे यांचा चक्क स्वतःचा पीव्हीसी पाईप बनवण्याचा व्यवसाय आहे. आज या व्यवसायातून त्या वार्षिक दीड कोटींचे उत्पन्न घेतात.
पार्वतीबाई फुंदे (Parvati Bai Phunde)यांनी 90 च्या दशकात हा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले होते. मात्र त्यांचे शिक्षण फक्त नववी पास असल्याने त्यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध होत न्हवते. याकाळात चक्क 22 बँकांनी पार्वतीबाईंना कर्ज देण्यास नकार दिला. मात्र पार्वतीबाईंनी स्वतःच्या हिंमतीवर एका बँकेकडून कर्ज मिळवून हा व्यवसाय सुरू केला.
औरंगाबाद येथील शेंद्रा एमआयडीसीमध्ये पार्वतीबाई यांची पीव्हीसी पाईप निर्मितीची कंपनी आहे. 2006 मध्ये ही कंपनी सुरू झाली. या कंपनीमध्ये विविध आकाराच्या पीव्हीसी पाईप्सची निर्मिती केली जाते. यासाठी कच्चा माल जळगाव व सुरत येथून आणला जातो.
येथे अर्धा इंच, एक इंच, दीड इंच, पाऊण इंच, दोन इंच, अडीज इंच, तीन इंच, चार इंच अशा आकाराच्या पाईप्स बनतात. कंपनीच्या सुरुवातीच्या काळात पाईप्सची निर्मिती झाल्यानंतर पार्वतीबाई यांच्यासमोर उत्पादनाची विक्री कशी करावी हा मोठा प्रश्न होता. मात्र त्या काळात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना पार्वतीबाईंनी पाईप्सची माहिती दिली.
इतकंच नाही तर हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पार्वतीबाई यांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण देखील घेतले. यामुळे त्यांना कंपनी सुरू करण्यासाठी आत्मविश्वास आला. याविषयी बोलताना त्या सांगतात की, ” शाळेमध्ये अभ्यासासाठी जसे शिक्षक असतात तसे उद्योगासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आहे”.
पार्वतीबाई फुंदे यांनी फक्त स्वतःपुरताच विचार केला नाही तर, आपल्या सारख्याच इतर महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभा करावा यासाठी त्या मार्गदर्शन करत असतात. आतापर्यंत 30 ते 35 महिलांना उद्योग निर्मितीसाठी मदत करत पार्वतीबाईंनी त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. भविष्यात 5 कोटींचे 51 उद्योग सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पार्वतीबाई सध्या वाटचाल करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- अनोख्या मैत्रीची राज्यभर चर्चा, मित्र सरपंच झाला म्हणून दिली नवीकोरी फॉर्च्युनर
- devendra fadanvis : पंकजा मुंडे ठाकरे गटात गटात जाणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्या मातोश्रीवर
- उर्फी जावेद- चित्रा वाघ वादाबाबत मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, म्हणाले…