Share

RBI : राज्यातील ‘या’ बँकेवर RBI चा घाला! खातेदारांना पैसे काढण्यावर बंदी, ‘लाडकी बहिणी’चे पैसेही अडकले

RBI  : मुंबईतील भवानी सहकारी बँक (Bhavani Sahakari Bank) आर्थिक संकटात सापडल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकेवर तातडीने निर्बंध लागू केले आहेत. ४ जुलै २०२५ पासून पुढील सहा महिन्यांसाठी या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात आली असून, खातेदारांना कोणताही आर्थिक व्यवहार किंवा रक्कम काढणे शक्य होणार नाही.

या निर्णयामुळे बँकेचे बँकिंग परवाना रद्द करण्यात आलेला नसला तरी, आरबीआयच्या परवानगीशिवाय भवानी बँक कुठल्याही नवीन कर्ज, ठेव किंवा आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. या निर्बंधांमुळे बँकेच्या आर्थिक अडचणी दूर झाल्याशिवाय कुठलीही सवलत देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

काय घडलं नेमकं?

दादर (Dadar) आणि घाटकोपर (Ghatkopar) परिसरातील शाखांमध्ये खातेदारांची गर्दी उसळली होती. खात्यातील रक्कम काढता न आल्यामुळे अनेक नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले. काहींनी राग व्यक्त करत बँकेतील कर्मचाऱ्यांकडे समाधानकारक उत्तरांची मागणी केली, मात्र बँकेकडून अधिकृत माहिती मिळण्यात अपयश आल्याचे दिसले.

आरबीआयची कारवाई का?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने बँकिंग रेग्युलेशन कायदा, १९४९ अंतर्गत ही कारवाई केली आहे. भवानी सहकारी बँकेची आर्थिक स्थिती गेल्या काही काळात ढासळल्याचे आढळून आले होते. आरबीआयने यापूर्वीही बँकेच्या संचालक मंडळव्यवस्थापन यांच्याशी सुधारणा प्रक्रियेबाबत चर्चा केली होती. मात्र, त्यात कोणतीही सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत.

लाडकी बहीण योजनेचे पैसेही अडकले

या निर्बंधांमुळे अनेक महिलांना लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत जमा केलेली रक्कमही परत मिळवण्यात अडचण येत आहे. दादर येथील एका महिलेनं सांगितलं की, ‘‘माझे ५,००० रुपये बँकेत अडकले आहेत. हे माझ्यासाठी अत्यावश्यक होते. अचानक बँकेने पैसे देण्यास नकार दिला.’’

अधिकाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया?

या संदर्भात रिझर्व्ह बँक आणि भवानी बँक प्रशासनाकडून अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. मात्र, बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्यास निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याचा विचार होऊ शकतो, असे आरबीआयने संकेत दिले आहेत. ग्राहकांच्या हितासाठी ही कारवाई करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सहकारी बँकांबाबत चिंता वाढली

भवानी बँकेवर आलेल्या निर्बंधामुळे सहकारी बँक व्यवस्थापनाच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील इतर अनेक सहकारी बँकांमधील कारभार आणि ग्राहकांची सुरक्षितता यावर आता चर्चेचं वातावरण आहे.

ताज्या बातम्या आर्थिक

Join WhatsApp

Join Now