Ravindra Chavan : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे लातूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. लातूर येथे प्रचारादरम्यान दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय जनता पक्ष नेत्याच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नेत्यांसह स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्याचं चित्र आहे.
या वक्तव्यावर सर्वात तीव्र प्रतिक्रिया अमित देशमुख यांची पाहायला मिळाली. वडिलांच्या आठवणी पुसल्या जातील, असं म्हणणं केवळ दुर्दैवीच नाही तर लातूरच्या इतिहासाचा अपमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून भाजपवर सत्तेच्या अहंकारातून अशी भाषा वापरली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
प्रचारसभेत बोलताना संबंधित नेत्याने “लातूर शहरातून त्या आठवणी नक्कीच पुसल्या जातील” असा दावा केला होता. या विधानानंतर राजकीय वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली. अनेक नेत्यांनी या वक्तव्याचा अर्थ काढत हा थेट लातूरच्या अस्मितेवर घाला असल्याचं म्हटलं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनीही जोरदार प्रतिहल्ला चढवत, विलासराव देशमुख यांचं लातूरशी असलेलं नातं कुणीही तोडू शकत नाही, असं स्पष्ट केलं. त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आयुष्य वाहिलेल्या नेत्याच्या आठवणी पुसण्याची भाषा करणाऱ्यांना लातूरकर योग्य उत्तर देतील, असा इशाराही दिला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे महापालिका निवडणुकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र झाली आहे. विकासाच्या मुद्द्यांऐवजी व्यक्तीगत टीका आणि भावनिक विषयांवर राजकारण तापत असल्याचं चित्र सध्या लातूरमध्ये पाहायला मिळत आहे.





