Ravi Rana : अमरावती येथील राणा दाम्पत्य आज अंबादेवीच्या दर्शनासाठी निघाले आहेत. ते अनवाणी पायाने आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन दर्शनासाठी निघाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळावं यासाठी देवीकडे साकडं घालणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, दरवर्षी आम्ही अमरावती येथील अंबादेवीच्या दर्शनाला येत असतो. सगळयांच्या जीवनात चांगले दिवस आणि सुख समृद्धी यावी यासाठी मी नेहमी अंबादेवीच्या चरणी साकडं घालते. तसेच शेतकऱ्यांचे दिवस चांगले यावे आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठीही मी दरवर्षी अंबादेवीला साकडं घालत असते, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, यावर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी साकडं घातलं आहे. एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण मिळावा यासाठी मी आज देवीला साकडं घातलं आहे आणि ते नक्की पूण होईल याची मला खात्री आहे, असे त्या म्हणाल्या आहेत. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, ज्यांनी आम्हाला हनुमान चालीसा वाचू दिली नाही ते आज घरी बसले आहेत. त्यामुळे जे बाळासाहेबांचे खरे विचारधारक आहेत त्यांच्याकडे हे चिन्ह गेलं पाहिजे यासाठी आम्ही हे साकडं घातलं आहे. तसेच एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार मांडणार असल्याने त्यांचे भाषण मी नक्की ऐकणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
रवी राणा यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आज आम्ही दरवर्षीप्रमाणे हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अनवाणी पायाने अंबादेवीच्या दर्शनासाठी आलो आहोत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याजवळ बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचा वारसा आहे. परंतु, त्यांच्या विचारांचा वारसा हा एकनाथ शिंदेंकडे आहे.
त्यामुळे शिवसेना चिन्ह आणि शिवसेना नाव हे शिंदेंना मिळेल यासाठी आम्ही अंबादेवीला साकडं घातलं आहे. मला विश्वास आहे की, एकनाथ शिंदेंच्या खऱ्या दसरा मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे सोडून सर्व शिवसैनिक प्रवेश करतील आणि महाविकास आघाडीशी जुळलेले काँग्रेसचे प्रणित उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसेल, असेही ते म्हणाले आहेत.
तसेच एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यामध्ये उरलेली उद्धव ठाकरेंची सेनासुद्धा शिंदे गटात प्रवेश करेल. मिलिंद नार्वेकर असो, आमदार असो किंवा नगरसेवक असो हे सगळेच शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
Ravi Rana : राणा विरूद्ध पोलिस संघर्ष पेटला; रवी राणा बदला घेणार, पोलिस आयुक्तांना दिला इशारा
आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाही; रवी राणांवर पलटवार करताना बच्चू कडूंची जीभ घसरली
विधान परिषदेच्या तोंडावर रवी राणांना झटका; अमरावती पोलिसांकडून अटक वॉरंट जारी
‘अनेक अपक्ष आमदार माझ्या संपर्कात’; आमदार रवी राणांनी उडवली महाविकास आघाडीची झोप