“रश्मी ठाकरे कधीही गाणं म्हणणे, चेहरा बदलणे, वेगवेगळी विधाने करणे यात पडल्या नाहीत”

मुंबई । राज्यात सध्या अन्वय नाईक आत्मह.त्या प्रकरणावरुन राज्य सरकारवर टीका होत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा केला आहे. यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर देखील आरोप केले होते. अमृता फडणवीस यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. यावर आता शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी या टीकेला उत्तर दिले आहे.

निलम गोऱ्हे म्हणाल्या, रश्मी ठाकरे कधीही गाणे म्हणणे, चेहरा बदलणे, वेगवेगळी विधाने करणे यामध्ये पडल्या नाही, मुलींना उचलून आणणारे नेते महिला सुरक्षेवर बोलत आहे. हाच सर्वात मोठा विनोद आहे अशी टीका त्यांनी राम कदम यांचे नाव न घेता केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी शपथपत्रात जमीन व्यवहाराची माहिती दिली आहे. किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत त्याबद्दल एका महिन्यात पुरावे सादर करावेत अन्यथा जाहीरपणे माफी मागावी, असे आव्हान निलम गोऱ्हे यांनी दिले आहे.

अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर झाला असला तरी हे प्रकरण अजूनही शांत झाले नाही. भाजप नेते सातत्याने ठाकरे कुटुंबावर टीका करत आहेत. आता किरीट सोमय्या यावर काय प्रतिक्रिया देणार हे लवकरच समजणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.