काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा(Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणासाठी मुंबईत दाखल झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याचा जोरदार विरोध केला होता. शिवसैनिक राणा दाम्पत्य राहत असलेल्या खार येथील घरासमोर ठाण मांडून बसले होते.(Rana supporters vandalize Shiv Sena Bhavan)
तसेच काही शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणांच्या अमरावतीमधील घराबाहेर आंदोलन केले होते. यानंतर आक्रमक शिवसैनिकांसमोर राणा दाम्पत्याने माघार घेतली होती. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून राणा दाम्पत्याला अटक देखील झाली होती.
न्यायालयाने या प्रकरणात राणा दाम्पत्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. काल मुंबई सत्र न्यायालयाकडून राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाल्यानंतर अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला होता. हा जल्लोष करत असताना राणा समर्थकांनी अमरावतीमधील शिवसेना भवनाची तोडफोड केली आहे.
अमरावतीमधील राजापेठ परिसरात शिवसेना भवन आहे. राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाल्यानंतर युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे काही कार्यकर्ते शिवसेना भवनात घुसले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत शिवसेना भवनातील खुर्च्यांची तोडफोड केली.
यावेळी शिवसेना भवन परिसरात पेट्रोल बॉटल देखील आढळली आहे. पोलिसांनी या प्रकरणात ४ हल्लेखोरांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात सध्या तणावाचे वातावरण पसरले आहे. या घटनेवर शिवसेनेकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. मुंबई सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर आज त्यांची सुटका करण्यात आली आहे.
खासदार नवनीत राणा यांना भायखळा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. तर आमदार रवी राणा यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. खासदार नवनीत राणा यांना भायखळा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राणा दाम्पत्याच्या वकिलांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी राज ठाकरेंना शिवसैनिकांचाच पाठिंबा; शिवसेनेत दुफळी?
‘राज ठाकरे हात जोडून माफी मागा, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही’, भाजप खासदाराचा इशारा
राज ठाकरेंच्या भूमिकेला खुद्द शिवसैनिकांचाच पाठिंबा, मशिदींवरील भोंगे उतरविण्यास सहमती