Share

Ramdas Kadam : “हिम्मत असेल तर राजीनामा देऊन दाखव!”, डान्सबार प्रकरणावरून रामदास कदम यांचा परबांना थेट इशारा

Ramdas Kadam : मुंबईत सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena vs Shivsena) असा स्फोटक राजकीय संघर्ष पेटलाय. या संघर्षात सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा, त्यांचे प्रश्न कोणीही बघत नाही, पण नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. ज्यांना कायद्याची आणि जबाबदारीची कदर असावी, तेच एकमेकांवर अत्यंत खालच्या थराचे आरोप करतायत, यामुळे शेतकरी, कामगार आणि सामान्य माणसाच्या मनात हळहळ निर्माण झाली आहे.

मुंबईमधल्या एका सावली डान्सबार प्रकरणावरून हा वाद चांगलाच पेटलाय. अनिल परब (Anil Parab) यांनी थेट योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केला की, डान्सबार त्यांच्या मातोश्रींच्या नावावर आहे. या आरोपावर योगेश कदम यांनी राजकीय सूडभावनेतून हे सगळं चाललंय, असं म्हणत प्रतिउत्तर दिलं. पण परब थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन, “लाज वाटत नाही का?” असा सवाल थेट कदम कुटुंबाला उद्देशून केला.

आता या वादात रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उडी घेतली आणि अनिल परब यांच्यावर खरमरीत पलटवार केलाय. “हिम्मत असेल तर राजीनामा देऊन दाखव”, अशा शब्दांत त्यांनी परब यांना थेट आव्हान दिलं. “मी कोणाच्या घशात भीक घालत नाही. दोन दिवसांत परब यांच्यावर हक्कभंग आणणार”, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

रामदास कदम यांनी स्पष्ट केलं की, “योगेश कदम यांच्या विरोधात आरोप करताना सभागृहात योग्य प्रक्रिया पाळली गेली नाही. ३५ ची नोटीस, सभापतींची परवानगी काहीच घेण्यात आलं नाही.” त्यामुळे या सगळ्या प्रकाराला ते नियमबाह्य मानतायत.

तसंच, “अनिल परब हा अर्धवट वकील आहे. मी ३२ वर्षे विधीमंडळात काम केलं आहे. मला प्रत्येक नियम माहिती आहे”, असं सांगत रामदास कदम यांनी परब यांच्यावर आपला अनुभव लावून टिकास्त्र सोडलं. इतकंच नाही तर, “जो सातबारा दाखवला तो खरा आहे का, हे दाखवायला परब यांनी त्यांच्या सगळ्या पिढ्या घ्याव्यात”, असा टोकाचा टोला लगावत, “बाप दाखव, नाहीतर श्रद्धा घाल”, असंही त्यांनी म्हटलं.

कदम कुटुंबाला संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उचलल्याचा आरोप करत, “राजकीय खेळात काही जमलं नाही म्हणून ते आता विधीमंडळात ही चिखलफेक करतायत”, असा ठपका देखील रामदास कदम यांनी ठेवला.

या सगळ्या प्रकरणातून एकच चित्र दिसतं. आरोपांची नंगानाच, जबाबदारीचा अभाव, आणि सामान्य जनतेचा विसर. एकीकडे डान्सबार बंद करण्याची भाषा, तर दुसरीकडे हक्कभंगाची धमकी. पण या सर्व राजकीय गदारोळात, खरे मुद्दे कुठेतरी हरवत चाललेत.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now