Ram Satpute : माळशिरसच्या राजकारणात पुन्हा एकदा धुराळा उडाला आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी भाजपचेच नेते रणजितसिंह मोहिते पाटील(Ranjitsinh Mohite Patil) यांना जाहीर आव्हान दिलं आहे. “फडणवीस साहेब एका रिंगवर फोन उचलतात. मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. निवडणुका लागूद्या, मैदानात या, तुम्हाला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही,” अशा शब्दांत सातपुते यांनी मोहिते पाटलांना टोला लगावला.
“फडणवीस एका रिंगवर फोन उचलतात” — सातपुतेंचा गर्जना मोड
माळशिरसमधील एका कार्यक्रमात राम सातपुते(Ram Satpute) म्हणाले, “मी पक्षाचा कट्टर कार्यकर्ता आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis,) माझा फोन एका रिंगवर उचलतात. हीच माझी ताकद आहे. मोहिते पाटील मैदानात या, निवडणूक लागली की तुमचं सामर्थ्य दाखवतो.”
पराभवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सक्रिय झालेले राम सातपुते
2024 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राम सातपुते यांना सलग पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्याविरोधात लोकसभा लढवली, तर विधानसभेत राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांनी त्यांचा पराभव केला होता.
मागच्या निवडणुकीत होते एकत्र, आता कट्टर विरोधक
2019 मध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सातपुतेंना पाठिंबा दिला होता. त्या निवडणुकीत राम सातपुते अवघ्या 2 हजार मतांनी विजयी झाले होते. मात्र, 2024 मध्ये मोहिते पाटील आणि जानकर हे एकत्र आले आणि सातपुते यांचा 10 हजार मतांनी पराभव झाला.
सातपुते पुन्हा आक्रमक, मोहिते पाटलांना थेट ललकार
सातपुते यांनी वारंवार मोहिते पाटलांना लक्ष्य करत त्यांना निवडणुकीत मैदानात उतरून सामोरे येण्याचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे माळशिरस विधानसभा मतदारसंघात आगामी राजकीय चित्र अधिकच रोचक होणार आहे.
पुढचं पाऊल कोणाचं?
राम सातपुते यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे माळशिरसचं राजकारण चांगलंच तापलं आहे. आता मोहिते पाटील याकडे काय उत्तर देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.