Rakesh Jhunjhunwala Died : नवी दिल्ली : ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे आज अचानक निधन झाले. ते फक्त 62 वर्षांचे होते. त्यांना भारताचे वॉरन बफे असेही संबोधले जात असे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा त्यांनी नुकतीच स्वतःची एअरलाइन सुरू केली होती. त्या एअरलाइनचे नाव आकासा एअर आहे. त्यांना स्टॉक मार्केटचा बिग बुल असे देखील म्हटले जाते.
त्यांच्या पत्नीचे नाव रेखा आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची अकासा एअरमध्ये सर्वात मोठी हिस्सेदारी आहे. दोघांचा एकूण वाटा ४५.९७ टक्के आहे. काहीच दिवसांपुर्वी या विमान कंपनीने उड्डाणे सुरू केली होती. गेल्या महिन्यात ५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस होता.
त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने संपूर्ण शेअर बाजार हळहळला आहे. झुनझुनवालांबद्दल असे म्हटले जात होते की, त्यांनी ज्या मातीला हात लावला त्या मातीचे सोने होते. राकेश झुनझुनवाला यांनी ३६ वर्षांपूर्वी फक्त 5,000 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरूवात केली होती. आज त्यांची एकूण संपत्ती 40 हजार कोटी इतकी प्रचंड आहे.
ज्या स्टाॅकवर त्यांचा जादुई हात पडायचा तो रातोरात उंची गाठायचा. यामुळेच त्यांच्या प्रत्येक चालीवर गुंतवणूकदारांची नजर असायची. स्टॉक्स निवडण्यामध्ये त्यांची नजर अतुलनीय होती. त्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केल्यापासून हे खरे ठरले. यामुळे राकेश झुनझुनवालांना भारताचे वाॅरन बफे म्हटले जायचे.
कॉलेजमध्ये शिकत असताना झुनझुनवाला शेअर मार्केटमध्ये उतरले होते. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्समधून त्यांनी सीएची पदवी घेतली. मात्र, ते दलाल स्ट्रीटच्या प्रेमात पडले. प्रचंड श्रीमंत व्हायचे असेल तर हे एकमेव ठिकाण आहे याची त्यांना खात्री होती. झुनझुनवाला यांना शेअर बाजाराची आवड त्यांच्या वडिलांमुळेच लागली होती.
त्यांचे वडील कर अधिकारी होते. ते अनेकदा त्यांच्या मित्रांसोबत शेअर मार्केटबद्दल बोलत असत. झुनझुनवाला ते लक्षपुर्वक ऐकायचे. झुनझुनवाला हे RARE एंटरप्रायझेस नावाची खाजगी ट्रेडिंग फर्म चालवत होते. 2003 मध्ये त्यांनी त्याची पायाभरणी केली. या कंपनीचे पहिले दोन शब्द ‘RA’ त्यांच्या नावावर होते. त्याच वेळी, ‘RE’ हे त्यांची पत्नी रेखाच्या नावाचे आद्याक्षर आहे.