Raju Shetti on Rajesh Kshirsagar: शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा देताना केलेल्या वक्तव्यामुळे राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) अडचणीत सापडले आहेत. कारण, त्यांनी राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्याकडे तब्बल 500 एकर जमीन असल्याचा दावा केला. या आरोपावर प्रत्युत्तर देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष आणि माजी खासदार शेट्टी यांनी थेट खुलं आव्हान दिलं आहे की, “त्या 500 एकर जमिनीचे सात-बारे घेऊन यायला विसरू नका, मी ती सगळी जमीन तुमच्या नावावर करायला तयार आहे!”
“मी जमीन तुमच्याच नावे करतो”
राजेश क्षीरसागर यांनी माध्यमांमध्ये दिलेल्या मुलाखतीत राजू शेट्टी यांच्याकडे 500 एकर जमीन असल्याचा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना शेट्टी म्हणाले, “मी गेल्या २५ वर्षांत सार्वजनिक जीवनात राहिलो असून पाच निवडणुकांत उमेदवारी अर्जासोबत माझ्या संपत्तीचं सविस्तर विवरण दिलं आहे. त्यात ज्या जमिनींचा उल्लेखच नाही, अशा 500 एकर जमिनीचे पुरावे म्हणजे सात-बारे त्यांनी समोर ठेवावेत.”
राजू शेट्टी यांनी पुढं स्पष्ट केलं की, “मी स्वतः २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता बिंदू चौकात हजर राहणार आहे. जर क्षीरसागर यांनी त्या 500 एकर जमिनीचे सात-बारे दिले, तर ती संपूर्ण जमीन मी त्यांच्या नावावर बक्षीसपत्र करून देईन.”
शेट्टींचा सणसणीत पलटवार
पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, जर राजेश क्षीरसागर यांनी ठरलेल्या वेळेवर बिंदू चौकात येऊन पुरावे सादर केले नाहीत, तर त्यांनी आपल्या नावे असलेली सर्व संपत्ती करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरा (Ambabai Temple) च्या नावे करावी. हे आव्हान केवळ राजकीय नसून सार्वजनिक पारदर्शकतेबाबतचा आग्रह आहे, असंही ते म्हणाले.