राजेश टोपेंची मोदींना कळकळीची विनंती; आम्ही पाया पडायला तयार, पण ऑक्सिजन उपलब्ध करा

मुंबई | राज्यात कोरोनाने गेल्या वर्षभरापासून थैमान घातले आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात बेड, लस, ऑक्सिजन यांचा मोठा प्रमाणावर तुटवडा जाणवू लागला आहे. रूग्णांना सुविधा मिळत नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये राज्यातील परिस्थीतीवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला कळकळीची विनंती केली आहे.

“राज्यातील जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. राज्य सरकार अक्षरश: नम्र विनंती करायला तयार आहे. पाया देखील पडायला तयार आहे. प्रश्न एवढाच आहे की ऑक्सिजनचा कोटा वाटपाचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. तो त्यांनी अधिकाधिक वाटावा. ग्रीन कॉरिडोर करून महाराष्ट्रात उपलब्ध करून द्यावा” असं राजेश टोपे म्हणाले.

पुढे म्हणाले, “केंद्र सरकारने दर दिवसाला रेमडेसिवीरचे २६ हजार वायल्स देण्याचं परिपत्र काढले आहे. केंद्राच्या निर्णयामुळे राज्य सरकारसमोरील आव्हान वाढलं आहे. यामुळे महाराष्ट्राला दररोज किमान १० हजार रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होणार आहे. त्यामूळे सरकारने पीएमओ स्तरावर महाराष्ट्राचा आणि देशाचा प्रश्न मार्गी लावावा” असंही टोपे म्हणाले.

“सीरमचे आदर पुनावाला यांच्याशी मी लसींसाठी चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की केंद्राने २४ मे पर्यंत उत्पादन बुक केले आहे. त्यामूळे १८ ते ४५  वर्ष वयोगटातील लोकांच्या लसीकरणासाठी आपल्याला एक महिना तरी लसींची खरेदी करता येणार नाही.” असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं चित्र दिसून येत नाही. राज्यात गेल्या २४ तासात ६७ हजार ४६८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर २४ तासात ५६८ कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात सध्या ६ लाख ९५,७४७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या-
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पुढाकार घेणाऱ्या रतन टाटांचे न्यायालयाकडून कौतूक; केंद्राला मात्र झापले
कोरोनाग्रस्त पत्नीला बेड मिळण्यासाठी जवानाची वणवण भटकंती, म्हणाला, मी देशासाठी मरतोय आणि..
गृहमंत्र्याच्या नावे ५ लाखांची खंडणी मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची होणार चौकशी
८५% पेशंटना रेमडेसिवीरची गरज नसते पण तरीही डाॅक्टर वापरतात; एम्सच्या तज्ञांची धक्कादायक माहिती

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.