राजस्थानने ख्रिस मॉरीसला दिलेले सव्वासोळा कोटी एकाच सामन्यात वसूल

मुंबई: आयपीएल 2021 च्या सातव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्लीला  तीन गडी राखून नमवून पहिला विजय नोंदविला. दिल्लीच्या कॅपिटलने पहिल्या डावात 20 षटकांत 147 धावा केल्या. मात्र राजस्थान रॉयल्सने दोन चेंडू शिल्लक असतानाच हा अटीतटीचा सामना जिंकला.

राजस्थान रॉयल्सकडून डेव्हिड मिलरने 62 धावा केल्या. मात्र त्याहीपेक्षा महत्वाच्या ठरल्या ख्रिस मॉरिसने केलेल्या 36 धावा. सामना गमावल्यात जमा असताना सव्वासोळा कोटी रूपये देऊन खरेदी केलेल्या ख्रिस मॉरीसने षटकारांची आतिषबाजी करत गेलेला सामना राजस्थान रॉयल्सला जिंकून दिला.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघात बेन स्टोक्स आणि श्रेयस गोपालच्या जागी डेव्हिड मिलर आणि जयदेव उनाडकट यांचा समावेश होता. दिल्ली कॅपिटल संघात शिगरॉन हेटमायर आणि अमित मिश्राच्या जागी कागिसो रबाडा आणि ललित यादव यांना संधी देण्यात आली.

प्रथम खेळताना दिल्ली कॅपिटलची सुरुवात खूपच खराब झाली आणि पहिल्या सात षटकांत चार गडी गमावले. जयदेव उनादकटने दुसर्‍या षटकात पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि  चौथ्या षटकात अजिंक्य रहाणे  यांना तंबूत पाठविले.

येथून  पंतने ललित यादवबरोबर पाचव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली आणि 30 चेंडूंत अर्धशतकही पूर्ण केले. टॉम करनने 16 चेंडूत 21 धावांची उपयुक्त खेळी साकारली पण मुस्तफिजुर रहमानने 19 व्या षटकात 128 धावांवर बाद केले.

त्याच षटकात 136  धावसंख्या असताना अश्विनही (7) बाद झाला. ख्रिस वॉक्स (15) आणि कॅगिसो रबाडा (9) यांनी संघाला 150 च्या जवळ आणले. राजस्थान रॉयल्सकडून जयदेव उनादकटने तीन, मुस्तफिजुर रहमानने दोन आणि ख्रिस मॉरिसने एक गडी बाद केला.

राजस्थान रॉयल्सनेसुद्धा लक्ष्याला प्रत्युत्तर देताना  17 धावांवर अव्वल तीन फलंदाज बाद झाले. मनन वोहरा 9 आणि जोस बटलर 2 धावा, तर संजू सॅमसन 4 धावांवर बाद झाला. पॉवरप्लेच्या 6 षटकांनंतर त्यांची धावसंख्या 26/3 होती.

इथून, डेव्हिड मिलरने राहुल तेवतिया सह सहाव्या विकेटसाठी  48 धावांची भागीदारी केली. शेवटच्या 5 षटकांत राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 58 धावांची आवश्यकता होती. 16 व्या षटकात डेव्हिड मिलरने 40 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि सलग दोन षटकार खेचून संघाला 100 धावांवर नेले, पण अवेश खानने मिलरला (43 चेंडू 62) बाद करून रॉयलला मोठा धक्का दिला.

येथून ख्रिस मॉरिसने गगनभेदी षटकारांच्या मदतीने १८ चेंडूत ३६ धावांची तडाखेबाज खेळी करत  शेवटच्या षटकात संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. दिल्ली कॅपिटलसाठी अवेश खानने सर्वाधिक तीन गडी बाद केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.