राज ठाकरेंनी मराठी मुद्द्यावरून यु-टर्न घेतलाय का? ठाण्यातील ‘त्या’ बँनरची चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी मनसे पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या या सभेचा टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला होता. ‘करारा जवाब मिलेगा’ असे कॅप्शन देत हा टीझर मनसे(MNS) नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.(raj thakre hindi banner in thane)

या दरम्यान ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्याने लावलेल्या बॅनरची सध्या चर्चा होतं आहे. मनसे विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी हा डिजिटल बॅनर लावला आहे. महत्वाची बाब म्हणजे हा बॅनर मराठीत नसून हिंदीत आहे. ‘मुंबई मैं बैठा हिंदूओ का राजा, अपनी हिफाजत चाहिए तो मनसे में आजा’ अशा हिंदी ओळी त्या बॅनरवर आहे.

ठाण्याती पाचपाखाडी भागात ठिकठिकाणी असे डिजिटल बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे मनसे पक्षाने मराठी मुद्द्यावरून यु-टर्न घेत हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातल्याचा चर्चा रंगू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे पक्षाने त्यांच्या झेंड्यात देखील बदल केला होता. त्यानंतर मनसे पक्षाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण सुरु केल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

राज ठाकरेंनी त्यांच्या सभेमधील भाषणात देखील हिंदुत्वाचा मुद्दा मांडला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या मनसे पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. ‘तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु’, असं वादग्रस्त विधान राज ठाकरे यांनी केलं होतं.

यावर काँग्रेस, राष्ट्रवादी यांसह इतर पक्षांनी राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा निषेध करत टीका केली होती. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ठाण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला ‘उत्तर सभा’ असे नाव देण्यात आले आहे. या सभेत राज ठाकरे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे दुपारी १२ वाजता ठाण्यात आगमन होणार आहे. ठाण्यातील शासकीय निवासस्थानात राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या भेटीत आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर राज ठाकरे सभेसाठी रवाना होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
रामनवमीच्या मिरवणुकीत डीजेच्या तालावर आमदारासह पोलीस अधिकारी थिरकले, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
मी असे पुरस्कार घेत नाही पण, ‘हा’ माझा पहिला अन् शेवटचा पुरस्कार; मोदींनी मंगेशकर कुटुंबीयांना स्पष्टच सांगितलं
राज ठाकरेंना दंगल पेटवायची असेल तर त्यांनी आधी स्वताच्या मुलाला रस्त्यावर उतरवावं; सुजात आंबेडकरांचं चॅलेंज