Raj Thackeray Meet Devendra Fadnavis: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. जवळपास ४५ मिनिटं चाललेल्या या चर्चेत टाऊन प्लॅनिंगसह (Town Planning) विविध शहरी समस्यांवर चर्चा झाली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःचा तयार केलेला आराखडा सादर केला. या बैठकीत मुंबईचे पोलीस आयुक्त (Police Commissioner) देखील उपस्थित होते.
राज ठाकरेंनी सांगितलं की, “अनधिकृत पार्किंग, फुटपाथवरील अतिक्रमण आणि नो-पार्किंग झोनसाठी विशेष रंग वापरला जावा, याबाबत आम्ही प्रेझेंटेशन दिलं आहे. सरकारने तज्ज्ञांना बोलावून या गंभीर प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करायला हव्यात. शहरांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर या समस्यांचा सोक्षमोक्ष काढणं अत्यावश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आपल्याकडे रिक्षा-टॅक्सींच्या अनधिकृत गाड्या भरल्या आहेत, मात्र कुठलीही कारवाई होत नाही. कुंपण शेत खातंय, सरकारी जागांवर झोपडपट्ट्या उभ्या राहतात, पण धनदांडग्यांना मात्र विशेष मोकळीक मिळते. मोठमोठ्या बिल्डर्ससमोर पार्किंग नको असं सांगितलं जातं, याविषयी मी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं आहे.”
राज ठाकरेंनी शहरातील वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. “मुंबई (Mumbai) ही जगातील एकमेव लोकल ट्रेन व्यवस्था आहे जिथे एवढ्या संख्येने लोक प्रवास करतात. रोज शहरावर लोकांचा ताण वाढतो आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना मर्यादा घालण्याची वेळ आली आहे. रस्त्यावर गाड्यांची संख्या अनियंत्रित झाली आहे. त्यामुळे पार्किंगची शिस्त लावणं सरकारची जबाबदारी आहे,” असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “२०१४ मध्ये मी शहराच्या सौंदर्य आणि नियोजनावर डॉक्युमेंट्री केली होती. आता त्याचं इतर भाषांमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठाणे (Thane), पुणे (Pune), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) यांसारख्या शहरांमध्येही पुनर्विकास होत आहे, पण अनधिकृत कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पाऊस ४०० मिमी पडतो, पण राज्य सरकार त्यावर काम करत नाही. कबुतरखाने आणि इतर गौण मुद्द्यांत अडकून आपण शहरांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत आहोत,” अशी टीका त्यांनी केली. बैठकीत टाऊन प्लॅनिंगचा आराखडा मुख्यमंत्र्यांना सादर करून त्यावर काम करण्याची मागणी राज ठाकरेंनी केली.






