Raj Thackeray On Balasaheb Thackeray : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या १३व्या स्मृतीदिनानिमित्त दादर येथील स्मृतीस्थळावर अभिवादन करताना भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, या अभिवादनावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील उपस्थित होते, ज्यामुळे अनेक वर्षांनंतर दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने वातावरणात वेगळाच रंग चढला. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरही एक दीर्घ पोस्ट शेअर करत बाळासाहेबांबद्दलची निस्सीम निष्ठा व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी लिहिलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावर अप्रत्यक्ष टीका केली. भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) यांना लक्ष करत त्यांनी म्हटलं की, बाळासाहेबांसाठी हिंदुत्व ही मतांची राजकारण करणारी गोष्ट नव्हती तर ती अस्मितेची आणि मूल्यांची उभी भिंत होती. त्यांच्या प्रतिमेचा वापर करून राजकीय लाभ घेणाऱ्यांची खिल्ली उडवत राज यांनी स्पष्ट शब्दांत मत व्यक्त केले.
राज ठाकरेंची सोशल मीडिया पोस्ट
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये बाळासाहेबांच्या कार्याचा आणि त्यांच्या विचारांच्या खोलीचा पुनःएकदा उल्लेख केला. त्यांनी लिहिलं की, भाषिक अस्मितेवर आधारित चळवळीपासून हिंदुत्वाचे सजग पुनरुज्जीवन करणारी भूमिका फक्त बाळासाहेबांसारख्या नेतृत्वानेच निभावली. त्या काळात देशात कमंडलवादाची लाट येण्याआधीच बाळासाहेबांनी हिंदू समाजाची ओळख जागी केली.
परंतु, त्यांनी कधीही हिंदुत्वाचा वापर मतांसाठी केला नाही. त्यांच्यासाठी हा विषय श्रद्धेचा, परंपरेचा आणि सामाजिक मूल्यांचा होता. प्रबोधनकारांच्या विचारसरणीतील तर्कवाद त्यांनी कधीही सोडला नाही. “आज जे स्वतःला हिंदुत्वाचे वारस म्हणवतात, त्यांना ना बाळासाहेब माहीत आहेत ना त्यांचे विचार,” अशी बोचरी टीका राज ठाकरेंनी नोंदवली.
तसेच त्यांनी लिहिले की, “सत्तासाठी नव्हे, समाजकारणासाठी राजकारण या तत्त्वाची प्रेरणा आम्हाला बाळासाहेबांकडूनच मिळाली. त्यांच्या स्मृतीस मनसेतर्फे विनम्र अभिवादन.”
राज–उद्धव ११ वर्षांनंतर एकत्र दिसल्याने शिवसैनिक भावूक
दादर येथील स्मृतीस्थळावर अभिवादनानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, तसेच कुटुंबीय काही क्षण एकत्र बसल्याचे दृश्य पाहून उपस्थित शिवसैनिकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. यापूर्वी दिवाळी, भाऊबीज आदी प्रसंगी ठाकरे कुटुंब एकत्र पाहायला मिळाले असले, तरी स्मृतीदिनानिमित्त राज–उद्धव यांचे एकत्र येणे हे ११ वर्षांनंतरचे दुर्मिळ दृश्य ठरले.
राज आणि उद्धव यांच्या काही मिनिटांच्या चर्चेनेही राजकीय वर्तुळात नवे अंदाज रंगत आहेत. अनेक समर्थकांनी हे दृश्य ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले.
शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता… pic.twitter.com/Z223LMW51S
— Raj Thackeray (@RajThackeray) November 17, 2025






