Raj Thackeray Municipal Corporation Election 2026: महाराष्ट्रात 70 उमेदवार बिनविरोध; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, माझ्या आयुष्यात……

Raj Thackeray Municipal Corporation Election 2026:महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदानाला काही दिवस शिल्लक असताना तब्बल 70 उमेदवार नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आल्याचं चित्र आहे. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर असल्याचं सूचक वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुखांनी केलं.

मुंबई (Mumbai) येथील शिवतीर्थ (Shivtirtha) या निवासस्थानी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी आपली भूमिका मांडली. “माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात मी अशी निवडणूक कधी पाहिली नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक निवडणुका अनुभवल्या, पण इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून येणं हे पहिल्यांदाच पाहतोय,” असं ते म्हणाले. बिनविरोध निवडीमागील परिस्थिती चिंताजनक असल्याचाही सूर त्यांनी लावला.

बिनविरोध निवडींमुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

राज्यातील विविध महापालिकांमध्ये घडत असलेल्या बिनविरोध निवडींमुळे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. निवडणूक म्हणजे लोकांनी आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार, पण जर लढतच होत नसेल तर लोकांचा सहभाग कुठे राहतो, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. विरोधक नसणं, नामनिर्देशन मागे घेणं आणि अचानक मैदान रिकामं होणं या सगळ्या बाबी संशयास्पद असल्याचं बोललं जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाची चौकशी, विजय घोषणेला स्थगिती

या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यातील बिनविरोध निवडींची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उमेदवारांवर दबाव टाकण्यात आला का, आमिष दाखवण्यात आलं का किंवा जबरदस्तीने नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडलं गेलं का, याची सखोल तपासणी होणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची अधिकृत विजय घोषणा केली जाणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. नियमभंग आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे.

भाजप आघाडीवर, शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर

आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार बिनविरोध निवडींमध्ये भाजप आघाडीवर आहे. एकट्या भाजपाचे 44 उमेदवार नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आले आहेत. त्यापाठोपाठ शिंदे गटाच्या शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपाचे सर्वाधिक 15, तर शिवसेनेचे 7 उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार, तर मालेगावमधून एक पक्षीय आणि एक अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे.